पिंपरी :इंद्रायणी नदीत उगम ते संगमापर्यंत मोठ्या प्रमाणावर मैला सांडपाणी, रसायनमिश्रित पाणी सोडले जात आहे. अकरा नाले थेट नदीत सोडले आहेत. आता पाच दिवस नदी फेसाळूनही आळंदी नगरपालिका, पीएमआरडीए, एमआयडीसी यांना कोठून दूषित पाणी मिसळते, हे सापडलेले नाही. त्यामुळे नदीसुधार योजनेच्या गप्पा फार्सच ठरत आहेत.
पुणे जिल्ह्याला धरण आणि नद्यांचे मोठे वैभव आहे. मात्र, नद्यांच्या आरोग्याकडे प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत वारंवार पर्यावरणवादी संस्थांनी आवाज उठवूनही त्यांचा आवाज लालफितीच्या कारभारातील प्रशासनापर्यंत पोहोचत नाही.
बुधवारपासून नदी फेसाळलेली
इंद्रायणी नदी आळंदीतील केटीवेअरपासून गावापर्यंत फेसाळलेली आहे. याबाबत नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ, पीएमआरडीए आणि नगरपालिकेकडे तक्रार करूनही त्याबाबत दखल घेतली नसल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
ते नाले थेटपणे नदीत!
पर्यावरणवादी संस्थांनी केलेल्या पाहणीनुसार, इंद्रायणी नदीचे प्रदूषण लोणावळ्यापासून सुरू होते. त्याचबरोबर तळेगाव दाभाडे, इंदोरी, देहूगाव या भागातील पाणी प्रक्रिया न करताच नदीत सोडले जात असल्याचे निरीक्षण नोंदविले गेले आहे. महापालिका क्षेत्रात एसटीपी प्लांट केले असले, तरी तळवडे, चिखलीतील दोन नाल्यांमधील पाणी थेट नदीत जात आहे. नदीच्या अलीकडे महापालिका आणि पलीकडच्या भागामध्ये चाकण एमआयडीसी, निघोजे, चिंबळी, मोई व आळंदी या गावांचा समावेश आहे. या भागात खासगी कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. नागरीकरणही मोठ्या प्रमाणावर झाले आहे. त्यांचे पाणी नदीत सोडले जात आहे. चिंबळी, मोई आणि निघोजेमधील अकरा नाले थेट नदीत सोडले आहेत. त्यामुळे प्रदूषणात भर पडली आहे.
महापालिका म्हणते, हे तर आमचे सांडपाणी नाही!
पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी म्हणाले, इंद्रायणी नदीच्या अलीकडच्या भागांमध्ये महापालिका क्षेत्र आहे. नागरिकांची तक्रार झाल्यानंतर संबंधित भागांमध्ये जाऊन पथकाने पाहणी केली. महापालिकेच्या भागातून रसायनमिश्रित पाणी जात नसल्याचे दिसून आले. पलीकडचा भाग पीएमआरडीए, नगरपालिका आणि एमआयडीसीचा आहे. संबंधित प्रशासनाने याबाबत दखल घेणे गरजेचे आहे. प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.