लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव मूळ : पूर्व हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारे डाळिंबाचे भाव प्रचंड प्रमाणात कोसळले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. बाजारात ३५ ते ४० रुपये खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही मिळेनासा झाला आहे. तालुक्यातील जिरायत भागात पाण्याच्या टंचाईमुळे खरीप व रब्बीची पिके घेण्यापेक्षा शेतकरी शाश्वत उत्पन्न देणाऱ्या डाळिंबपिकाकडे वळला आहे. छाटणी, औषधे, मजुरी तसेच प्रसंगी टँकरने पाणी घालून फळ येईपर्यंत शेतकऱ्यांना मोठ्या खर्चाला सामोरे जावे लागते. या बागा उभ्या करण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बँकांकडून कर्ज घेतलेले आहे. मात्र सध्या बाजारातच व्यापाऱ्यांकडून डाळिंब सरासरी ३५ ते ४० रुपये प्रतिकिलो खरेदी होत आहे. मात्र, या भावात उत्पादन खर्च तर सोडाच, बँकाचे कर्जाचे हप्ते व व्याजही फिटणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे.या सर्व प्रकाराला नोटाबंदी, शासनाची शेतीक्षेत्राबाबतची अनास्था, शेतीविषयक दीर्घकालीन नियोजनाचा अभाव, हमीभावाबाबत दुर्लक्ष, साठवणुकीसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेले अपयश यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.या सर्व बाबींना सरकारी धोरण जबाबदार आहे. मात्र याचा फटका शेतकऱ्यांना बसला असल्याने शासनाने यामध्ये तातडीने लक्ष घालून डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना या बिकट परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी आर्थिक पॅकेज देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.बाजारपेठेत बाकीच्या फळांचीसुद्धा मोठी आवक झाल्याने डाळिंब विक्रीवर परिणाम झाला आहे. सध्या डाळिंबाला जास्त भाव नसल्याने शेतकरी तोडणीयोग्य डाळिंबाची तोडणी थांबवून नंतर मालाला योग्य भाव मिळेल, अशी आशा धरून बसलेत, पण यामुळे डाळिंब आतून काळे पडून नंतर सध्याच्या भावापेक्षाही कमी भाव मिळेल, म्हणून आताच तोडणीस योग्य असलेले डाळिंब तोडणी करून विक्रीस द्यावे.- तानाजी चौधरी, प्रमुख डाळिंब अडतदार
डाळिंबाचे भाव कोसळले
By admin | Published: May 08, 2017 2:11 AM