लोकमत न्यूज नेटवर्क
आळेफाटा : आळेफाटा उपबाजारात मंगळवारी (दि २७) झालेल्या लिलावात डाळिंबाला उच्चांकी भाव मिळाला. २० किलो क्रेटला पाच हजार रुपये असा कमाल भाव मिळाल्याचे सभापती संजय काळे उपसभापती दिलीप डुंबरे यांनी सांगितले.
आळेफाटा उपबाजारात जून महिन्याच्या शेवटीही २० किलो क्रेटला पाच हजार रुपये असा भाव मिळाला होता. डाळिंबाचा हंगाम जून महिन्यात सुरू झाला. आळेफाटा उपबाजारात डाळींबाची आवक वाढली. सुरवातीला असणारे सरासरी भाव नंतर वाढत गेले. जुलै महिन्यात डाळींबाचे भाव हे कमी अधिक राहिले. पावसाने कीड रोगाचा प्रादुर्भाव डाळींबावर झाल्याने येथील आवक मागील काही दिवसात कमी होत आहे. जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यांतील शेतकरी येथे डाळींब विक्रीस आले होते. आठवडाभर येथील लिलावात दर्जेदार डाळींबाचे वीस किलो क्रेटला चार हजार रुपयांचेवर दर मिळाले होते. मंगळवारी येथे ४ हजार १०० क्रेट विक्रीस आले असल्याचे सचिव रूपेश कवडे व कार्यालयप्रमूख प्रशांत महांबरे यांचे यांनी सांगितले. परराज्यांतून तसेच माॅलमधुन डाळींबास मागणी वाढल्याने भावात वाढ झाली असल्याचे आडतदार व्यापारी प्रवीण लेंडे, संजय कुऱ्हाडे, निलेश भुजबळ, संदीप कोरडे निशिकांत डोमसे यांनी सांगितले.
चौकट
प्रतवारीप्रमाणे प्रती वीस किलो क्रेटला मिळालेले दर
एक नंबर डाळींब ३ हजार ५०० ते ५ हजार रुपये, दोन नंबर डाळींब : दोन हजार ते ३ हजार ५०० रुपये. तीन नंबर डाळींब : १ हजार २०० ते दोन हजार रुपये. ४ नंबर डाळींब ४०० ते १ हजार २०० रुपये.