शैलेश काटे, इंदापूरसंस्था बुडाली, पगार थकला, त्यात डोळ्यांच्या आजाराने खिशातील दमडीही शिल्लक राहिली नाही. मात्र, पत्नी व दोन मुलांच्या मदतीने अवघ्या एका एकरात डाळिंबाच्या बागेपासून ८ लाख ६५ हजारांचे उत्पादन घेऊन शेतकऱ्याने आपला संसार सावरला.इंदापूर शहरापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर माळवाडी नं. १ च्या रस्त्याला लागून असणारी म्हेत्रेवस्ती ही अंकुश म्हेत्रे यांची जन्मभूमी. पत्नी शकुंतला, मुले सिद्धार्थ व विश्वम असे आटोपशीर कुटुंब. गेली तिसेक वर्षे इंदापुरातील तालुका दूध संघात नोकरीला असणारे म्हेत्रे यांची परवड दूध संघाचा कारभार डळमळीत झाल्याने सुरू झाली. त्यात डोळ्यांचा आजाराने खर्च वाढवला. मुलांचे शिक्षण सुरू असतानाच हा प्रसंग ओढवल्यामुळे म्हेत्रे काळजीत पडले. आपल्याकडे असलेली एक एकर ५ गुंठे जमीन कसण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पत्नी व मुलांना विश्वासात घेतले. त्यांनाही परिस्थितीचे गांभीर्य होतेच. मिळून कष्ट करण्याची तयारी त्यांनी दाखविली. ही त्यांच्या भावी यशाची पहिली नांदी होती. याच वेळी त्यांना रानडे कृषी औषधचे होडशीळ व बळीराजा कृषी सेवा केंद्राचे प्रकाश मारकड यांचे मार्गदर्शन मिळाले.आपल्या रानात म्हेत्रे यांनी भगवा जातीच्या डाळिंबाची ५५० झाडे लावली. चालूच्या दुसऱ्या पिकाची छाटणी त्यांनी केली. सहा ट्रॉली शेणखत, सुरुवातीचा रासायनिक भेसळ डोस दिला. एक मार्चला पाणी दिले. दोन महिन्यांनी सेटिंग झाल्यानंतर दुसरा डोस दिला. ब्लोअर ट्रॅक्टरने औषधफवारणी केली.तोडणीयोग्य माल झाल्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पहिला तोडा झाला. सहा टन माल निघाला. दुसऱ्या तोड्यात चार टन व तिसऱ्या तोड्यात दोन टन माल निघाला. या १२ टन मालाव्यतिरिक्त एक ते दीड टन माल झाडावर आहे. सरासरी प्रतिकिलोस ८० रुपये दर मिळाला. शेणखत, औषधे व इतर आनुषंगिक बाबींसाठी झालेला ९५ हजार रुपये खर्च वजा जाता, ८ लाख ६५ हजार रुपयांचा नफा म्हेत्रे कुटुंबाने मिळविला आहे.
डाळिंबाने सावरला संसार
By admin | Published: September 23, 2016 2:16 AM