लोकमत न्यूज नेटवर्कयवत : प्रतिपंढरपूर म्हणून गणल्या जाणाऱ्या डाळींब (बन) (ता. दौंड) तीर्थक्षेत्र विकासासाठी आवश्यक ती सर्व कामे करणार असल्याची ग्वाही पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी दिली. आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाची महापूजा देवकाते यांच्या हस्ते करण्यात आली. यानंतर ते बोलत होते. दौंड, हवेली व पुरंदर तालुक्यांच्या वेशीवर असलेल्या डाळींब (बन) विठ्ठल मंदिराला प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते. परिसरातील हजारो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येथे येत असतात. मंगळवारी पहाटे ६ वाजता महापूजा करण्यात आली. यावेळी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, दौंड पंचायत समिती सभापती मीना धायगुडे , उपसभापती सुशांत दरेकर, हवेली पंचायत समितीच्या सभापती वैशाली महाडिक, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती राणी शेळके, जिल्हा परिषद सदस्या पूनम दळवी, कीर्ती कांचन, नितीन दोरगे, हेमलता बडेकर, प्रा. के. डी. कांचन, महादेव कांचन, सरपंच मंगल सुतार, देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष राजेंद्र कांचन , तात्यासो ताम्हाणे उपस्थित होते.कृषी व हवामान तज्ज्ञ बापूसाहेब शिंदे यांनी यावेळी बोलताना सुरुवातीला आपल्या परिसरात पाऊस आता थांबला आहे. मात्र पावसाचे लवकरच पुनरागमन होणार असून १०० टक्के इतका पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला. आषाढी एकादशीनिमित्त डाळींब बन विठ्ठल मंदिरात आज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. पहाटे महापूजा झाल्यानंतर सकाळी ११ वाजता डाळींब गाव ते विठ्ठल बन मंदिर पर्यंत श्रींच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली होती. दुपारी १२ ते ५ दरम्यान मंडपात विविध गावांच्या भजनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सायंकाळी ९ वाजता ‘गर्जा महाराष्ट्र’ हा मराठमोळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.पहाटेपासूनच मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या.दिवसभर मंदिरात गर्दी वाढतच होती.देवस्थान ट्रस्टच्या वतीने ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये यासाठी बंदोबस्त ठेवला होता. तर पोलीस प्रशासनाने वाहनांचे पार्किंग करताना अडचणी होऊ नयेत यासाठी नियोजन केले होते. एस.टी.ने यात्रा स्पेशल बस ठेवलेल्या होत्या.बन देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा दर्जायावेळी महापूजेनंतर झालेल्या कार्यक्रमात आमदार राहुल कुल म्हणाले, डाळींब बन देवस्थानला शासनाचा ‘ब’ तीर्थक्षेत्र दर्जा मिळाला आहे. परिसरातील अनेक विकासकामे मार्गी लावली असून, आणखी कामे करण्यासाठी प्रस्ताव पाठवावेत असे आवाहन त्यांनी केले.
डाळींब बन तीर्थक्षेत्राचा विकास करणार
By admin | Published: July 05, 2017 2:57 AM