पुणे : गेल्या काही वर्षांत श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये डाळिंब व्यापार व व्यापाऱ्यांची संख्या वाढत आहे. यामुळे बाजार समितीच्या आवारात डाळिंबाच्या अडत्यांसाठी डाळिंब यार्ड उभारण्यात येत आहे. हा डाळिंब यार्ड कॉमन सेल हॉल करीत सर्व अडत्यांना समान जागा द्यावी, असा प्रस्ताव आडते असोसिएशनने बाजार समितीकडे दिला आहे. परंतु समिती प्रशासनाचा आवकेनुसार जागावाटप कण्याचा आडमुठी भूमिका घेतली असून, समान जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे.
गेल्या दोन-तीन वर्षांपासून फळबाजारातील इतर अडत्यांकडेही डाळिंबाची आवक वाढल्याने त्यांनाही अतिरिक्त जागेची आवश्यकता होती. मागील चार-पाच वर्षांपासून संबंधित डाळिंबाचे व्यापारी अतिरिक्त जागेची मागणी करीत होते. त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. आता जागेची खूपच निकट वाटू लागल्याने बाजार समितीने डाळिंब व्यापाºयांसाठी जनावरांच्या बाजारामागील मोकळ्या जागेत डाळिंब यार्ड उभारण्याचा निर्णय घेतला आहे.नवीन यार्डात जागावाटपासाठी आवकेनुसार जागा या निकषाने जागावाटपाची योजना प्रशासकांची आहे. मात्र, जागा वाटून दिल्यास संबंधित व्यापारी स्वत:चे आॅफिस, शौचालये बांधून मक्तेदारी करण्याची शक्यता आहे. जे की पूर्वीच्या डाळिंब यार्डात झाले होते. त्यामुळे जागावाटपात दुजाभाव न करता डाळिंब यार्ड कॉमन सेल हॉल करून सर्वांना समान जागा देण्याचा प्रस्ताव आडते असोसिएशनने समितीला दिला आहे.
याबाबत अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ म्हणाले, नवीन डाळिंब यार्डात सर्व अडत्यांना समान जागा देत कॉमन सेल हॉलमध्ये व्यापार करण्याची संकल्पना अडत्यांनी सर्वसाधारण सभेत मांडली होती. त्यास अनेक अडत्यांनी सहमती दर्शविली असून त्याबाबतचा प्रस्ताव बाजार समितीला दिला आहे. याविषयी समितीने सोमवारी (दि. २७) चर्चेसाठी बोलाविले आहे. असाच प्रस्ताव कांदा बाजारासाठीही दिला आहे.डाळिंबाचा वाढता व्यापार लक्षात गेल्या काही वर्षांपूर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेने गेट क्रमांक चार लगत सुमारे ३० गुंठे मोकळ्या जागेत डाळिंब यार्ड उभारले. आजपर्यंत त्यात फक्त चार अडतेच डाळिंबाचा व्यापार करीत आहेत. संबंधित अडत्यांनी स्वत: जागेचे वाटप करून आपली मक्तेदारी निर्माण केली.