मंचर : गणेशोत्सवामध्ये निर्माल्य गोळा करण्याची व्यवस्था करणे आणि गणपती विसर्जनासाठी फिरते हौद, कृत्रिम तलाव तयार करणे ही ग्रामपंचायतींची जबाबदारी आहे. ग्रामपंचायतींनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची जबाबदारी पार पाडल्यास नदी, ओढे, नाल्यांचे जलप्रदूषण रोखले जाईल. अशी भूमिका तारुण्यवेध संघटनेने मांडली आहे.
पर्यावरणपूर्वक उत्सव साजरे करण्यासंबंधी राज्य सरकारने १० वर्षांपूर्वी म्हणजेच ३ मे २०११ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश दिले, पण अद्यापही त्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे तारुण्यवेध संघटनेचे संघटक विशाल विमल, अध्यक्ष विकास पोखरकर, उपाध्यक्ष राहुल पोखरकर, रविराज थोरात यांनी पिंपळगाव ग्रामपंचायतीला या आदेशाचे स्मरणपत्र दिले आहे.
याबाबत विशाल विमल यांनी सांगितले की, विशेषत: घोडनदीत अनेक गावांचे सांडपाणी आणि कारखान्यामधील दूषित पाणी सोडल्याने नदी प्रदूषित झाली आहे. त्यामुळे नदीत मूर्ती विसर्जित करून आणखी प्रदूषण करणे योग्य नाही. मूर्तीमध्ये पारा, शिसे आणि रासायनिक घटकाचे रंग असतात, त्याने अधिक पाणी प्रदूषित होते. काही गावांतील नागरिक नदीचे पाणी पितात. त्यांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे, तसेच या क्षारयुक्त पाण्यामुळे शेतजमिनीवर त्याचा परिणाम होऊन शेतीचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे नागरिकांनी हौदात गणपती विसर्जन करावे आणि नदीत निर्माल्य टाकू नये. त्यासाठी ग्रामपंचायतने व्यवस्था निर्माण करावी आणि सरकारच्या आदेशाचे पालन करावे. ग्रामपंचायतने गणपती विसर्जनासाठी फिरत्या हौदांची व्यवस्था करावी. तसेच, ठिकठिकाणी हौद उभारावेत. हौदात विसर्जित झालेल्या मूर्ती आणि निर्माल्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी, असे या आदेशात म्हटले आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीला पाणी लागले की, त्या दगडासारख्या घट्ट होतात. त्याच्यापासून अधिक प्रदूषण होते. त्यामुळे शाडू अथवा मातीपासून बनविण्यात आलेल्या नैसर्गिक रंगाच्या मूर्तींच्या वापरास ग्रामपंचायतने प्रोत्साहन द्यावे. ग्रामपंचायतने ओला व सुका कचरा आणि निर्माल्य गोळा करण्याची व्यवस्था उभी करावी, असेही या आदेशात म्हटले आहे.