पुणे : आत्तापर्यंत कोणत्याही प्रकरणात एखाद्या मंत्र्याचे नाव आले की त्याचा तत्काळ राजीनामा घेतला जायचा. मात्र या प्रकरणात तसे होताना दिसत नाही. जर मंत्र्याचा सहभाग या प्रकरणात नसेल तर तसे जाहीर का करत नाहीत? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना ते अशा प्रकरणात न्याय द्यायचे. आता त्यांच्या मुलाने म्हणजेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही हे पाळावे, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
पुण्यात चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणावर भाष्य करत विविध मुद्दे देखील उपस्थित केले. पाटील म्हणाले, कोणी एक्साईटमेंट मध्ये मंत्र्याचे नाव घेतले असेल तरी मला आणि देवेंद्र फडणवीसांना नाव घेण्याची परवानगी नाही. मात्र पूजा चव्हाण प्रकरणी आता मुख्यमंत्र्यांनीच न्याय द्यावा. याबरोबरच जर कुणा मंत्र्यांचा या प्रकरणी काही संबंध नसेल तर उद्धव ठाकरेंनी तसे स्पष्ट करावे. याचबरोबर गुन्ह्यांमध्ये नावे आलेल्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे घ्या अशीही मागणी पाटील यांनी यावेळी केली आहे.
पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वी पूजा चव्हाण या २२ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. त्या प्रकरणी पोलिसांकडुन अजुनही गुन्हा नोंद झालेला नाहीये. महाविकास आघाडीतल्या एका मंत्र्याचा सहभाग असल्यानेच ही दिरंगाई होत असल्याचा आरोप भाजप करत आहे. पोलिस तिची लॅपटाॅप ताब्यात घेवुन तपास का करत नाहीत असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे. पोलिसांची याच चूक नसून पोलिसांवर दबाव असल्यानेच हे होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.