पुणे : संपूर्ण राज्यभरात गाजत असलेल्या पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी करणारा एक खासगी खटला येथील लष्कर न्यायालयात शुक्रवारी दाखल झाला. या खटल्यावर पाच मार्च रोजी निकाल अपेक्षित आहे.लीगल जस्टिस सोसायटीतर्फे ॲड. भक्ती पांढरे यांनी या संदर्भात लष्कर न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर झालेल्या युक्तिवादानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रोहिणी पाटील यांच्या न्यायालयात हा खटला दाखल झाला आहे.
वानवडी परिसरामध्ये पूजा चव्हाणचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणी सातत्याने होत असतानाही पंधरा दिवस उलटले तरी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे या प्रकरणातील सत्यता बाहेर येण्यासाठी हा खटला दाखल केला असल्याचे सोसायटीचे अध्यक्ष ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी सांगितले.
या प्रकरणाशी राज्यातील एका मंत्र्यांचे नाव जोडले जात आहे. काही व्हिडीओ क्लिपही बाहेर आल्या आहेत. मात्र न्यायालयात खटला दाखल करताना कुणाचेही नाव न घेता अज्ञात व्यक्तीविरुद्ध हा खटला दाखल करण्यात आला असल्याचे ते म्हणाले.
पूजा चव्हाण मृत्यूनंतर पोलिसांना वारंवार तक्रार अर्ज देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. रजिस्टर गायब होणे किंवा व्हिडीओ क्लिप्स व्हायरल होणे याबाबत पोलीस कोणतीच कारवाई करताना दिसत नाही. आमच्याही अर्जावर पोलिसांनी कोणतीच कारवाई न केल्यामुळे आम्ही स्वत:हून कोर्टात धाव घेतली.- ॲड. विजयसिंह ठोंबरे, अध्यक्ष लीगल जस्टिस सोसायटी
‘आमच्या कुटुंबाला चार दिवस जगू द्या’- लहू चव्हाण
पूजाची होत असलेली बदनामी थांबवावी, आमच्या कुटुंबाला चार दिवस जगू द्यावे, असे कळकळीचे आवाहन पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी शुक्रवारी ‘लोकमत’शी बोलताना केले. ते म्हणाले की, माझ्यावर पाच मुलींची जबाबदारी आहे. आता कुठं आम्ही सावरू लागलो आहोत. परंतु जी बदनामी केली जात आहे, त्याचे दुःख होत आहे. त्यामुळे कोणीही बदनामी करू नये.
लहू चव्हाण यांना बीपीचा त्रास आहे. लहान बहीण दहावीला आहे, तिची आई आजारी आहे. अशा स्थितीत विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप होत आहेत, ते योग्य नाही. बदनामी थांबली पाहिजे, अन्यथा बंजारा समाजाला काहीतरी विचार करावा लागेल, असे बीडच्या शिवसेना महिला आघाडी प्रमुख ॲड. संगीता चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.