पुणे : परळी येथील तरुणी पूजा चव्हाण आत्महत्या करण्यावरून दोन व्यक्तींमधील ऑडिओ क्लिप समाजमाध्यमावर व्हायरल झाल्याने या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या ऑडिओमध्ये एक व्यक्ती समोरील व्यक्तीला बोलताना ती आत्महत्या करणार आहे असे सांगत आहे. त्यामुळे तुम्ही समजावून सांगा, असेदेखील ती म्हणत आहे. त्यामुळे संभाषण करणाऱ्या दोन व्यक्ती कोण आहेत असादेखील यानिमित्ताने प्रश्न निर्माण होतोय. दरम्यान, पोलीस तपासात पूजाच्या आईवडिलांनी आत्महत्येबद्दल आमची कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचे म्हटले आहे.
त्याच वेळी आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात कथित मंत्री आणि त्या अरुण नावाच्या कार्यकर्त्याचे संभाषण झाले. त्या वेळी तो कार्यकर्ता त्या युवतीच्या मृतदेहाच्या शेजारीच होता आणि त्या कथित मंत्र्याने सदर युवतीचा मोबाईल ताब्यात घेण्याचा आदेशही दिल्याचे या व्हायरल ऑडिओ क्लीपमधून स्पष्ट होते.
पूजा लहू चव्हाण (वय २२, रा. हेवन पार्क, महंमदवाडी, मूळगाव. परळी, जि. बीड) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुण्यातील महंमदवाडी येथील हेवन पार्क येथे घडली होती.
पूजा चव्हाण हिच्या डोक्याला व पाठीला मार लागल्याने तिचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. याबाबत समाजमाध्यमामध्ये व्हायरल झालेल्या २ ऑडिओ क्लिप ऐकल्या असून त्यावरून नेमके समजू शकत नसल्याचे व अद्याप याबाबत कोणी तक्रार केली नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.