लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ९ वेळा परीक्षा देण्याची मुभा असताना प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी तब्बल १२ वेळा परीक्षा दिली. परीक्षा देताना स्वत:, वडील व आईचे नाव बदलल्यानेच हा कारनामा करता आल्याचेही स्पष्ट झाले आहे.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील गैरवर्तणूकच नव्हे, तर मसुरीतील लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीतही त्यांना गैरवर्तणुकीबाबत तब्बल ८ वेळा मेमो बजावण्यात आले होते. जाणीवपूर्वक खोटी माहिती देणे, प्रशिक्षणाच्या काळात केलेले गैरवर्तन यामुळे अखेर त्यांना यूपीएससी परीक्षा देण्यापासून कायमस्वरूपी बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वैयक्तिक प्रशिक्षण विभागाच्या नोटिशीत खेडकर यांनी यूपीएससीची फसवणूक केल्याचे उघड झाले होते. त्यात खेडकर यांनी ओबीसी प्रवर्गातून अर्ज केला होता. त्यानुसार त्यांना केवळ ९ वेळा परीक्षा देण्याची मुभा असताना स्वत:, वडील व आईचे नाव बदलून तब्बल १२ वेळा परीक्षा दिल्याचे उघड झाले आहे.
राज्य सरकारने दिलेल्या अहवालातही खेडकर या आयएएस अधिकारी म्हणून काम करण्यास अयोग्य असल्याचे नमूद करत त्यांची वर्तणूक गंभीर असल्याचाही शेरा मारण्यात आला आहे.
आई-वडील यांचीही नावे अनेक वेळा बदलली
यूपीएससीची परीक्षा देताना पूजा यांनी स्वत: ९ वेळा खेडकर पूजा दिलीपराव हे नाव वापरले. तर ३ वेळा पूजा मनोरमा दिलीप खेडकर असे नाव वापरले. तसेच वडिलांच्या नावात ७ वेळा खेडकर दिलीपराव कोंडिबा, २ वेळा खेडकर दिलीप के, १ वेळा दिलीप खेडकर, १ वेळा दिलीप के. खेडकर, तर १ वेळा दिलीप खेडकर असे नमूद केले आहे. आईचे नाव ४ वेळा खेडकर मनोरमा दिलीपराव, ३ वेळा बुधवंत मनोरमा जगन्नाथ, २ वेळा बुधवंत मनोरमा जे. व ३ वेळा मनोरमा बुधवंत असा वापर केला.
नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राचा लाभ
या नोटिशीत पूजा खेडकर यांनी २०२२मध्ये ओबीसी प्रवर्गातून नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राचा लाभ घेतल्याचा उल्लेख स्पष्टपणे करण्यात आला आहे. वास्तविक पूजा यांचे वडील दिलीप खेडकर हे राज्य सरकारच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात वर्ग १ अधिकारी म्हणून निवृत्त झाले होते. त्यामुळे त्यांचे उत्पन्न वर्षाला केवळ ८ लाखांपेक्षा कमी कसे असेल, असा सवालही उपस्थित केला गेला. पूजा खेडकर यांची २०२२ मध्ये आयएएस म्हणून झालेली निवड बहुविकलांग या प्रवर्गातील विशिष्ट दिव्यांग या उपप्रवर्गातून झाल्याचेही नोटिशीत स्पष्ट करण्यात आले आहे.