पुणे : इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ९ वेळा परीक्षा देण्याची मुभा असताना प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरने (Pooja Khedkar) थेट UPSC च्या डोळ्यांतच धूळफेक केल्याचे स्पष्ट झाले आहे. खेडकरने १२ वेळा परीक्षा दिली. परीक्षा देताना स्वत: वडील व आईचे नाव बदलल्यानेच हा कारनामा करता आल्याचेही स्पष्ट झाले आहे.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील गैरवर्तणूकच नव्हे, तर मसुरीतील लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीतही त्यांना गैरवर्तणुकीबाबत तब्बल ८ वेळा मेमो बजावण्यात आले होते. जाणीवपूर्वक खोटी माहिती देणे, प्रशिक्षणाच्या काळात केलेले गैरवर्तन यामुळे अखेर त्यांना यूपीएससी परीक्षा देण्यापासून कायमस्वरूपी बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे येथे प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून नेमणूक वादग्रस्त ठरल्यानंतर खेडकरची वाशीम येथे बदली करण्यात आली. त्यानंतर दिव्यांगाबाबतचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, प्रशिक्षणादरम्यान केलेली गैरवर्तणूक याबाबत तक्रारी आल्यानंतर केंद्र सरकारने तिचा प्रशिक्षण कालावधी स्थगित करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला. तसेच, तातडीने मसुरीला अकादमीत हजर होण्यासही सांगण्यात आले. याबाबत यूपीएससीने कारणे दाखवा नोटीस बजावली. सोबतच केंद्र सरकारच्या वैयक्तिक प्रशिक्षण विभागानेही १० पानांची नोटीस बजावली होती.
वैयक्तिक प्रशिक्षण विभागाच्या नोटिशीत खेडकरने यूपीएससीची फसवणूक केल्याचे उघड झाले होते. त्यात खेडकरने ओबीसी प्रवर्गातून अर्ज केला होता. त्यानुसार त्यांना केवळ ९ वेळा परीक्षा देण्याची मुभा असताना स्वत:, वडील व आईचे नाव बदलून तब्बल १२ वेळा परीक्षा दिल्याचे उघड झाले आहे. परीक्षा देताना स्वत: ९ वेळा खेडकर पूजा दिलीपराव हे नाव वापरले. तर ३ वेळा पूजा मनोरमा दिलीप खेडकर असे नाव वापरले. तसेच वडिलांच्या नावात ७ वेळा खेडकर दिलीपराव कोंडिबा, २ वेळा खेडकर दिलीप के, १ वेळा दिलीप खेडकर, १ वेळा दिलीप के. खेडकर तर १ वेळा दिलीप खेडकर असे नमूद केले. तर आईचे नाव ४ वेळा खेडकर मनोरमा दिलीपराव, ३ वेळा बुधवंत मनोरमा जगन्नाथ, २ वेळा बुधवंत मनोरमा जे. व ३ वेळा मनोरमा बुधवंत असा वापर केला. त्यामुळे यूपीएससीच्या डोळ्यात धूळफेक करणे सहज शक्य झाले.
या नोटिशीत खेडकरने २०२२ मध्ये ओबीसी प्रवर्गातून नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्राचा लाभ घेतल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. वास्तविक खेडकरचे वडील राज्य सरकारच्या प्रदूषण नियंत्रण मंडळात वर्ग १ अधिकारी म्हणून निवृत्त झाले होते. त्यामुळे त्यांचे उत्पन्न वर्षाला केवळ ८ लाखांपेक्षा कमी कसे असेल, असा सवालही उपस्थित केला गेला. खेडकरची २०२२ मधील आयएएस म्हणून निवड बहुविकलांग या प्रवर्गातील विशिष्ट दिव्यांग या उपप्रवर्गातून झाल्याचेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रशिक्षण काळातही मेमो
मसुरी येथील लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीतही पायाभूत कोर्स पूर्ण करताना गैरवर्तणुकीबाबत ३ वेळा मेमो देण्यात आले. त्यानंतरच्या आयएएस व्यावसायिक टप्पा १ मध्येही ५ वेळा मेमो दिल्याचे अकादमीने दिलेल्या अहवालात स्पष्ट करण्यात आले होते. याचदरम्यान शिस्तपालन व वागणुकीत ३० पैकी ११, समवयस्क मूल्यांकनात १५ पैकी ३.१४, संचालकांच्या मूल्यांकनात २०० पैकी १०५.३ गुण मिळाले तर एकंदरीत मूल्यांकनात तिचा क्रमांक २० वा होता. याच काळात त्यांच्या वर्तणुकीसाठी अनेकदा समुपदेशनही करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. राज्य सरकारने दिलेल्या अहवालातही खेडकर आयएएस अधिकारी म्हणून काम करण्यास अयोग्य असल्याचे नमूद करत त्यांची वर्तणूक गंभीर असल्याचाही शेरा मारण्यात आला आहे.