पुणे : मुळशी तालुक्यातील दडवली गावातील शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याच्या गुन्ह्यात सह आरोपी असलेल्या दिलीप खेडकर यांना ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश अजित मरे यांनी दि. २५ जुलै पर्यंत अटी शर्तीवर तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला.
शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा यांना पौड पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दिलीप खेडकर यांनाही अटक होण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे अटक टाळण्यासाठी त्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले होते. त्यांनी ऍड सुधीर शहा यांच्यामार्फत पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावर शुक्रवारी कोर्टात सुनावणी झाली. ऍड शहा यांनी खेडकर यांच्या वतीने युक्तिवाद केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने दिलीप खेडकर यांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला.