महाड/पुणे : परीविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी हिरकणीवाडीतील एका लॉजमधून गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता अटक केली. मनोरमा मुळशीतील शेतात एका शेतकऱ्याला धमकावत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यांनी पुणे पोलिसांशीही हुज्जत घातली होती. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस त्यांचा शोध घेत होते. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
रायगडच्या पायथ्याशी लॉजमध्ये मनोरमा असल्याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास पोहोचले. त्यांनी सर्व लॉज कसून तपासले.
मनोरमा खेडकर व त्यांच्यासोबत असलेली एक व्यक्ती बुधवारी रात्री साडेनऊ वाजता हिरकणीवाडी येथे आली. पार्वती हॉटेलमध्ये दादासाहेब ढाकणे आणि इंदुताई ढाकणे या बनावट नावाने दोघे राहिले. या नावाचे आधारकार्डदेखील त्यांनी दाखवले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
वर्षभरानंतर गुन्हा दाखल
व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर शेतकरी पंढरीनाथ पासलकर यांनी एका वर्षानंतर १२ जुलै रोजी पौड पोलिसात तक्रार दाखल केली.
त्यानुसार मनोरमा खेडकर त्यांचे पती दिलीप खेडकर व त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
तपासासाठी तीन पथके
मनोरमा यांना ताब्यात घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी तीन पथके स्थापन केली होती. पोलिसांनी सुरूवातीला त्यांच्या बाणेर येथील बंगल्यावर तपास केला होता. परंतु, त्यांच्या घराला कुलूप होते. त्यांचा मोबाइलही बंद होता.