भाजप अनुसुचीत
जाती मोर्चाची मागणी
बारामती :बारामती शहरातील पूनावाला गार्डन या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन बारामती नगरपरिषदेला देण्यात आले आहे.
या निवेदनानुसार, पंधरा दिवसांपूर्वी मुंबई येथे महिलेवर अमानुष अत्याचार व नंतर हत्या करण्यात आली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर बारामती नगर परिषद सार्वजनिक उद्यान येथे महिला मुली दररोज फिरण्यासाठी येत असतात. मुंबईतील झालेल्या अत्याचारामुळे महिला व मुली यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. शहरातील गुल पूनावाला गार्डन या ठिकाणी अशा अमानवीय घटना घडू शकतात. त्यामुळे दक्षता म्हणून तत्काळ या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे. जर पंधरा दिवसांत सीसीटीव्ही कॅमेरे न बसविल्यास महिला किंवा मुलींच्या बाबतीत काही अनुचित प्रकार घडल्यास प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी, असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. या वेळी साजन अडसुळ, अक्षय गायकवाड, शैलेश खरात, सागर भिसे, शरद भगत, संजय दराडे आदी उपस्थित होते.
बारामती नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देताना भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे पदाधिकारी.
२१०९२०२१-बारामती-०३
----------------------------