पुणे : शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना, गोरगरीब व सर्वसामान्य कोरोनाबाधितांना खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणे आवाक्याबाहेर गेले आहे़ त्यामुळे पुणे महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधितांवर उपचार सुरू करून, त्यांना लागणारी सर्व औषधे मोफत द्यावीत अशी मागणी शिवसेनेचे पालिकेतील गटनेते पृथ्वीराज सुतार, शहराध्यक्ष संजय मोरे, संजय भोसले, श्याम देशपांडे आदींनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाव्दारे केली आहे़
या निवेदनात शिवसेनेच्या वतीने, महापालिकेच्या प्रत्येक रुग्णालयात २४ तास डॉक्टर व अन्य वैद्यकीय कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देण्यात यावा. तसेच जम्बो कोविड सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू करावे अशी मागणी करण्यात आली आहे़ दरम्यान, जे संपर्क क्रमांक बेड मिळविण्यासाठी दिले आहेत ते कधीच लागत नसल्याचा आरोपही या निवेदनात करण्यात आला असून, सत्ताधारी भाजप पुणेकरांची फसवणूक करून त्यांच्या जिवाशी खेळत असल्याचे म्हटले आहे़ तर पुणेकरांच्या पैशातून फक्त जाहिराती व पोपटपंची करण्यापेक्षा, पुणे महापालिकेच्या शहरातील प्रत्येक भागामध्ये पूर्वीप्रमाणे विलगीकरण कक्ष सुरू करावे. येथे कोरोनाबाधितांना विलग ठेवावे जेणे करून इतरांना संसर्ग होणार नाही याची प्रशासनाने काळजी घ्यावी अशी मागणी केली आहे़
दरम्यान, पुणेकरांच्या पैशांची सत्ताधाºयांकडून चाललेली उधळपट्टी थांबवून, हा पैसा पुणेकरांच्या आरोग्यासाठी वापरून पुणेकरांचा जीव वाचवावा. पुणेकरांवरील कोरोना संक्रमण थोपवण्यासाठी व कोरोना बाधित रूग्णांच्या उपचारासाठी सढळ हाताने निधी उपलब्ध करून देण्यात यावा. पुणे महानगरपालिकेमध्ये अनावश्यक विकास कामाचा दिखाऊपणा पूर्णपणे थांबवावा. व राज्य शासनाच्या नियमावलीनुसार विकास कामांचा प्राधान्यक्रम ठरविण्यात यावा, अशी मागणी केली आहे़