नीरा नरसिंहपूर : सर्वसामान्य लोक हीच आमची संपत्ती आहे. सहकारमंत्री असताना सामान्य म्हणजे एखाद्या गरिबालासुद्धा नीरा भीमा, इंदापूर कारखान्यात सभासद करून घेतले नाहीच; पण कारखान्यातील कामगारांनाही वेतनवाढीपासून वंचित ठेवल्याची टीका राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता केली.
पिंपरी बुद्रुक (ता. इंदापूर) येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा स्थलांतरित, तसेच विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, कल्याण आखाडे प्रताप पाटील, हनुमंतराव कोकाटे, उपाध्यक्ष नवनाथ रुपनवर, पुणे जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी आनंद थोरात, माजी सरपंच श्रीकांत बोडके, सचिन सपकाळ, सुरेश शिंदे, अभिजित तांबिले, विजय शिंदे, शुभम निंबाळकर, अतुल झगडे, अभिजित रणवरे, विनोद घोगरे, ज्ञानेश्वर घोगरे, दत्तात्रय तोरस्कर, नागेश गायकवाड, बबन बोडके, नामदेव बोडके, प्रभाकर बोडके, दत्तू बोडके, शहाजी बोडके, ग्रामपंचायत सदस्य पांडूदादा बोडके, संतोष सुतार, सुदर्शन बोडके, सरपंच ज्योती बोडके, उपसरपंच अनुराधा गायकवाड, रमेश मगर, शहाजी सूळ, जगू मोहिते आदी उपस्थित होते.
दत्तात्रय भरणे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून विकासकामे करण्यात येत आहे. तालुक्यातील एकही रस्ता कामाविना शिल्लक राहिला नाही. या रस्त्यांच्या कामासाठी ८०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे रस्तेही बांधकाम विभागाच्या माध्यमातून करण्यात येतील. पिंपरी बुद्रुकमध्ये आल्यानंतर बोडके दादांची आठवण येते. माझ्या राजकारणाचा पहिला पाया त्यांनी भरला. त्यामुळेच मी राजकारणात आलो. त्यांचे ऋण कधीच विसरणार नाही, असे उद्गारही भरणे यांनी काढले.
रमेश थोरात म्हणाले, पिंपरी बुद्रुक येथे जिल्हा बँकेला एटीएमची मागणी आली असून येथे लवकरच एटीएम देण्यात येईल.
दरम्यान, आमदार फंडातून मंजूर केलेला पीरसाहेब सभामंडपाचे भूमिपूजन, नरुटे वस्ती रस्ता काँक्रिटीकरण उद्घाटन व विकास सेवा सोसायटीचे ७१ व्या वर्षात पदार्पण झाल्याबद्दल संस्थेचे चेअरमन सुदर्शन बोडके व सचिव तुकाराम मगर यांचा यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
--------------------------------------
११ नीरा नरसिंहपूर
जिल्हा बँकेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करताना दत्तात्रय भरणे, रमेश थोरात व इतर.