तळेगाव ढमढेरे: येथील नरकेआळी या ठिकाणी असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली असून, नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान, स्वच्छतागृहाची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे.
तळेगाव ढमढेरे येथील नरकेआळी या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीने उभारण्यात आलेले सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या सर्व बाजूंनी मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढलेली असून पुरुषांसाठी नवीन बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहांच्या फरशा तुटून पडल्या आहेत, तर भांडीही काही दिवसातच निखळून पडलेली आहेत ,त्यामुळे याचा वापर करणे फारच धोकादायक झाले आहे. पर्याय नसल्याने या दुरवस्था झालेल्या धोकादायक स्वच्छतागृहाचा या परिसरातील नागरिक दररोज वापर करावा लागत आहे.
काही ठिकाणी तर अक्षरशः दरवाजेच नाहीत. महिलांसाठी बांधण्यात आलेले जुन्या स्वच्छतागृहासमोर दोन्ही बाजूने मंदिरे असून संरक्षण भिंती खूप कमी उंचीच्या असल्याने येथे येणाऱ्या महिलांची कुचंबणा होत आहे,तर येथे वाढलेल्या गवत व झाडांमुळे या ठिकाणी सापांसह अन्य प्राण्यांची देखील भीती वाढेलेली आहे. त्यामुळे येथील स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्याबाबत सामाजिक कार्यकर्ते गोरक्षनाथ कऱ्हेकर,अरुण गायकवाड,गौरव मंडलिक,राजेंद्र कऱ्हेकर,मारुती गोडसे,मनोहर बोराटे,सुनीता कुंभार यांसह आदींनी लेखी निवेदनाद्वारे ग्रामपंचायत प्रशासनाकडे मागणी केली आहे. मात्र, नव्याने उभारण्यात आलेल्या शौचालयांची काही दिवसातच इतक्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालीच कशी, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. या शौचालयातील पाच भांड्यांची फारच दयनीय अवस्था झाली असून फक्त एकच भांडे सुस्थितीमध्ये आहे.येथे वापरण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीची संबंधित प्रशासनाकडून स्वच्छता केली जात नाही.
तळेगाव ढमढेरे येथे शौचालयांच्या झालेल्या दुरवस्थेबाबत तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतीला ग्रामस्थांनी निवेदन दिलेले असून, याबाबत चर्चादेखील करण्यात आलेली आहे, सध्या ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती फारच बिकट आहे. करवसुली झाल्यानंतर, लवकरच शौचालयांची दुरुस्ती करण्यात येईल.
संजय खेडकर, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत तळेगाव ढमढेरे
२४तळेगाव ढमढेरे
तळेगाव ढमढेरे येथील स्वच्छतागृहाची झालेली दुरवस्था दाखविताना सामाजिक कार्यकर्ते गोरक्षनाथ कऱ्हेकर.