दावडी : राजगुरूनगर ते कनेरसरकडे जाणाऱ्या खेड सिटी रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रेटवडी या ठिकाणी खड्ड्यांमुळे अनेक लहान मोठे अपघातात होऊन नागरिकांचा बळी जात आहे. या रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
राजगुरूनगर ते कनेरसरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या परिसरात सेझ प्रकल्प आल्याने दिवसेंदिवस या रस्त्याची वर्दळ वाढली आहे. रस्त्यावर खड्डे पडल्याने अपघात होण्याचे प्रमाणात वाढ होत आहे. गेल्या काही महिन्याभरात या रस्त्यावर खड्ड्यांमुळे लहान मोठे अपघात होण्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये काही जणांचे बळी गेले असून कित्येक जणांना कायमचे अपंगत्व व आले आहे. हा रस्ता परिसरातील सर्वच प्रमुख ठिकाणांकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग ठरत असल्याने अलीकडच्या काळात या रस्त्यावरील वाहतूक प्रचंड वाढली आहे. मुळातच हा रस्ता अरुंद असून, वळणावळणाचा आहे. त्यातच आता रस्त्यावरून वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने हा रस्ता चांगलाच धोकादायक बनला आहे.
काही ठिकाणी या रस्त्यालगत खोल नाले असल्यामुळे अशा ठिकाणी धोका आणखी वाढला आहे. त्यामुळे या रस्त्यासंदर्भात पुरेशा उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे. समोरासमोरून वाहने आल्यास त्यांना मार्ग काढण्यास अडचणी येतात.काही भागात या रस्त्याच्या कडेला दाट झाडी असल्यामुळे त्या झाडांच्या फांद्याही अडचणीच्या ठरत आहेत. त्यातच या रस्त्यावरील वळणावळणांतून वाहने चालविताना वेगमर्यादा पाळली जात असली, तरी समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नसल्यामुळे अपघात घडण्याची शक्यता वाढली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने यांची दखल घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी रेटवडी ग्रामपंचायतचे सदस्य दिलीप डुबे, किरण पवार, माजी उपसरपंच नवनाथ पवार, माजी ग्रामपंचायत सदस्य सुभाष हिंगे, अतुल थिटे यांनी केली आहे.
०८ दावडी रस्ता
राजगुरूनगर ते कनेरसर या रस्त्यावर पडलेले खड्डे.