दोन महिन्यांपूर्वी शहरात पिण्याच्या पाईपलाईनसाठी नगर परिषदेने रस्ते खोदाई केली होती. यामध्ये शहरातील अंतर्गत डांबरी रस्ते,पाबळ रोड या रस्त्याची खोदाई करून त्यामध्ये पाईप गाडण्यात आले होते. मात्र, या रस्त्याची पुन्हा व्यवस्थित डागडुजी दुरुस्ती ठेकेदारानी केली नाही. शहरातील नागरिक, छोटे-मोठे व्यवसायिक, नोकदार वर्ग यांचे शहरातील अंतर्गत रस्ते हे समस्यांचे केंद्रबिंदू बनले आहेत.सध्या पावसळा सुरू झाल्याने रस्त्यावर सर्वत्र गाळ पसरला आहे. शहरात नागरिकांना आजारी रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे.
भाजीपाला, किरणा खरेदी करण्याकरिता जाणाऱ्या महिलांनाही या रस्त्यावरून जाताना गैरसोय होत आहे. अनेक दुचाकीस्वार या निसरड्या रस्त्यावरून जाताना घसरून पडत आहेत. तसेच पाबळ रोड चव्हाण मळा येथेही खेड ते कनेरसर रस्ता खोदाई करण्यात आला होता. मात्र पुन्हा व्यवस्थित दुरुस्ती डागडुजी न केल्यामुळे पावसाच्या पाण्याने या रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. या खड्डयात पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना तसेच दुचाकीस्वारांना या पाण्यातील खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे. संबंधित ठेकेदाराकडून करारनाम्याच्या अटी व शर्तीनुसार शहरातील अंतर्गत रस्तेदुरुस्ती करावेत अशी मागणी खेड तालुका भीमशक्ती अध्यक्ष विजय डोळस यांच्यासह नागरिकांनी केली आहे.
०५ राजगुरुनगर रस्ता
पाबळ रोड चव्हाण मळा येथे खोदाई केलेल्या रस्त्यांची व्यवस्थित दुरुस्ती न केल्यामुळे रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे.