दावडी : खरपुडी खंडोबा (ता. खेड) येथील ट्रान्सफॉर्मरची गेल्या पाच वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. अद्यापपर्यंत महावितरणने यावर कोणतीही उपाययोजना केली नाही. दरम्यान, हा धोकादायक ट्रान्सफॉर्मर बदलावा, अशी मागणी खरपुडीचे सरपंच हिरामण मलघे, खंडोबा देवस्थान ट्रस्ट्रीचे अध्यक्ष सोपान गाडे यांच्यासह ग्रामस्थांनी महावितरणकडे केली आहे.
खरपुडी खंडोबा गावाची लोकसंख्या एक हजार ५००च्या आसपास आहे. गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी हा ट्रान्सफॉर्मर आहे. यांची गेल्या पाच वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. हा ट्रान्सफॉर्मर खिळखिळा झाला असून, यातील फ्युज तुटून गेले आहेत. विद्युतवाहक तारेवरचे प्लास्टिक आवरण निघून गेले आहे. कमी दाबाचा ट्रान्सफॉर्मर असल्याने वारंवार फ्यूज उडत आहे. रात्री अपरात्री फ्यूज उडाल्यास फ्यूज टाकण्यासाठी वायरमन उपलब्ध होत नाही. त्यामुळे गावात रात्रीचा अंधार पसरतो. ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून फ्यूज बसवावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे. या ट्रॉन्सफार्मरचे लोखंडी दरवाजे निखळले असून, ट्रॉन्सफॉर्मर सताड उघडा असतो. त्यामुळे अजूनच धोका वाढला आहे.
ग्रामस्थांनी या ठिकाणी नवीन ट्रॉन्सफार्मर जास्त दाबाचा बसवावा, अशी लेखी मागणी केली आहे. मात्र महावितरण विभागाने कुठलीही दखल न घेता ग्रामस्थांच्या मागणीला केराची टोपली दाखवली. एखादी दुर्घटना घडल्यावर महावितरण जागे होणार का, असा सवाल शेतकरी व ग्रामस्थांनी केला आहे. या ठिकाणी तत्काळ नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावा, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.
२६ दावडी
खरपुडी खंडोबा (ता. खेड) येथे झालेली ट्रान्सफॉर्मरची दुरवस्था.