कोरोनामुळे गतवर्षापासून गरीब कुटुंबांना अनेक समस्यांना तोड द्यावे लागत आहे. बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. एक वेळ अन्नालादेखील काही कुटुंबे महाग झाल्याचे समोर आले आहे. मध्यंतरीच्या काळात सर्व निर्बंध हटवण्यात आली होती. त्यामुळे कुठेतरी रोजगार उपलब्ध होत होता. विस्कटलेली आर्थिक घडी रुळावर येईल असे वाटत असताना गेल्या दोन महिन्यांपासून पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले. त्यामुळे अनेकांचे जगणे अवघड झाले आहे. सर्वसामान्य, गरीब, झोपडीत राहणाऱ्या व दररोज रोजंदारीने काम करून आपल्या कुटुंबाची पोटाची खळगी भरणाऱ्या देशातील लाखो कामगारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याप्रमाणेच शिरूर शहरातही अशी शेकडो कुटुंब राहत आहेत.
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथील व्यापारी संघाचे उपाध्यक्ष संतोष भंडारी, प्रकाश सुराणा व राजू दुगड यासह आडते दुकानदारांच्या या उन्हाळ्याच्या हंगामात शिरूर, पारनेर, श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांची सुमारे शेकडो टन चिंचेचा व्यवहार होतो. ही वाळलेली चिंचाचे टरफल फोडणे, चिंचोके वेगळे करणे, त्यांचा गाभा वेगळा करणे ही कामे केली जातात. यानंतर चिंचेच्या या घटकांचे पॅकिंग करून हे व्यापारी कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गुजरात राज्यात खाद्य पदार्थांसह वेगवेगळ्या उपयोगासाठी पाठवितात.
ही वाळलेली चिंच या व्यापाऱ्यांनी घेतल्यानंतर सुमारे १५ ते २० किलो चिंच वजन करून घरी आणणे, फोडणे, त्यांचे चिंचोके वेगळे करणे, टरफले वेगळे करणे व पुन्हा वजन करुन देणे यासाठी प्रत्येकी किलोला सुमारे १० ते १५ रुपयांचा भाव या आडते व्यापाऱ्यांकडून दिला जातो. याप्रमाणे शहरातील ही सर्वसामान्य, गरीब, झोपडीत राहणारे, महिला व पुरुष असे शेकडो कुटुंबे चिंच फोडण्याची कामे करत आहे. शहरातील ५०० कुटुंबांना रोजगार उपलब्ध झाला असून त्यांच्या उरनिर्वाहाचा तूर्त प्रश्न मिटला आहे. असे आडते व्यापारी संतोष भंडारी व परेश सुराणा यांनी सांगितले.
२१ शिरूर