पुणे : शासनाचा काेट्यवधींचा खर्च हाेऊनही शासकीय वसतिगृहांत मुला-मुलींना ना धड राहण्याची सुविधा व्यवस्थित मिळते, ना जेवण चांगले मिळते. हीच स्थिती आंबेगाव कात्रज येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात अनुभवायला येत आहे.
घरची परिस्थिती बेताची असल्याने अनेकांना शिक्षण अर्धवट साेडून मिळेल ते राेजगार करत असतात. आवड असूनही परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही. आज किमान शासकीय वसतिगृहांमुळे राहणे आणि जेवणाची सोय हाेते म्हणून तरी काही गरीब विद्यार्थी शिक्षणासाठी गावाबाहेर पडण्याचे धाडस करू शकतात.
मेरिटनुसार शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतल्यानंतर या विद्यार्थ्यांना साेयी-सुविधांऐवजी विविध समस्यांचाच सामना करावा लागत आहे. जेवणाचा दर्जा सुधारून सामाजिक न्याय मिळणार का, असा प्रश्न सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह खडकवासला आंबेगाव कात्रज येथील विद्यार्थिनी विचारत आहेत. याबाबत वरिष्ठांना तक्रार केली, तर धमकावत असल्याने नाईलाजास्तव मुली गप्प बसतात, असे येथील विद्यार्थिनींनी नाव न छापण्याच्या अटींवर सांगितले.
१०० क्षमता असलेल्या मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहातील जेवणाचा दर्जा दिवसेंदिवस खराब होत आहे. याबाबत वसतिगृह प्रमुखाकडे तक्रारी घेऊन गेल्यावर आम्हालाच रागावले जाते. तुमच्या कारवाई केली जाईल, असे सांगितले जात असल्याने कितीही समस्या असल्या तरी तक्रार करण्याचे धाडस काेणी करत नाही, असे मुलींनी सांगितले.
वसतिगृहातील समस्या
- जेवणाचा दर्जा नाही की, सरकारी नियमांप्रमाणे मेनू नाहीत
- ग्रंथालयाची सोय नाही
जेवणासाठी प्रतिविद्यार्थी मिळतात ४,८०० रुपये
- सामाजिक न्याय विभागातील वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी जेवणासाठी दरमहा ४,८०० रुपये दिले जातात. यात नाष्टा, दूध, चहा, दोन वेळचे जेवण आदींचा समावेश असतो. जेवणात पापड, लोणचे, सॅलेड, रविवारी चिकन/मटन, शुक्रवारी अंडाकरी असा समावेश असणे अपेक्षित आहे.
जेवणाच्या दर्जाबाबत काही तक्रार असेल त्याची नोंद घेऊन आवश्यक सुधारणा केली जाईल. याबाबत तेथील गृहपाल यांना सूचना देण्यात येईल.
- संगीता डावखर, सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग, पुणे
जेवणाच्या दर्जाबाबत मी तक्रार केली असता वसतिगृहप्रमुख माझ्यावरच खडसावल्या. त्यानंतर मी सामाजिक न्याय विभागाच्या पुणे कार्यालयात जाऊन तक्रार केले. ते प्रमुखांना समजले आणि त्या मला खूप बोलल्या. माझ्या सोबत असणाऱ्या मैत्रिणींनाही बोलल्या. तेव्हापासून त्या मुलीही माझ्याशी बोलत नाहीत. तेव्हापासून आम्ही तक्रार न करता जे समाेर येईल ते खात आहाेत.
- त्रस्त विद्यार्थिनी