पुणे : पुणे शहरातील बहुचर्चित कात्रज-कोंढवा रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी पालिका चक्क मुरूम आणि खडीचा वापर करत आहे. त्यामुळे खड्डे तर नीटपणे बुजत नाही. पण मुरूम टाकल्यामुळे रस्त्याच्या त्या भागात चिखल होत आहे. त्यामुळे मुरमाचा चिखल आणि खडीवरून अनेक दुचाकी स्वार घसरून पडत आहे. पालिकेच्या या उरफाट्या कारभाराचा नागरिकांना फटका बसत आहे.
कात्रज-कोंढवा रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून त्यात पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे . या रस्त्यावरील राजस सोसायटीजवळील चौकात मोठमोठ खड्डे पडले आहेत. त्यात याच ठिकाणी कलवडचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्याप्रमाणात होत आहे. या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचत आहे. त्यामुळे वाहतूकदारांना अडचण होत आहे. गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास महापालिका मुरूम आणि खडीचा वापर करत आहे. त्यामुळे खड्डे तर नीटपणे बुजत नाही; पण मुरूम टाकल्यामुळे रस्त्याच्या त्या भागात चिखल होत आहे. त्यामुळे मुरमाचा चिखल आणि खडीवरून अनेक दुचाकीस्वार घसरून पडत आहे.
पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
कात्रज कोंढवा रस्त्याचे भूसंपादन होईल तेव्हा होईल; पण सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी पालिका प्रशासन डांबर, सिमेंट काँक्रीट, पेव्हिंग ब्लॉगचा वापर करणे आवश्यक आहे. या रस्त्यासाठी चक्क मुरूम आणि खडीचा वापर केला जात आहे. त्यामुळे या रस्त्याकडे पालिका प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
वाहतूक कोंडी नित्याची बाब
कात्रज कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण रखडले असून अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी कामे सुरू आहेत. त्यात या रस्त्यावर वाहनाची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वाहतूक कोंडी तर नित्याची बाब झाली आहे.
मृत्यूचा सापळा ....
कात्रज चौक ते खडीमशीन चौक या साडेतीन किलोमीटरच्या मार्गात एकूण ५० अपघात झाल्याची नोंद भारती विद्यापीठ आणि कोंढवा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. त्यात २० जणांचा बळी गेला आहे. अरुंद रस्ता, अवजड वाहतूक, रस्त्यावरील खड्डे यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.
खड्डे बुजविण्यासाठी मुरूम आणि खडीचा वापर
कात्रज-कोंढवा रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी मुरूम आणि खडीचा वापर केला जात आहे. या रस्त्यावर वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. त्यात पाऊसही जास्त आहे. त्यामुळे डांबर टाकले तर ते लगेच वाहून जाते. त्यामुळे मुरमाचा वापर केला जात आहे. - व्ही.जी. कुलकर्णी, पथविभाग प्रमुख, महापालिका