पुणे : अरिजित सिंगच्या सर्व चाहत्यांसाठी रविवारची संध्याकाळ मंत्रमुग्ध करणारी मेजवानी ठरेल असे वाटत होते. पण, अशी संध्याकाळ आणि असा कॉन्सर्ट पुण्यामध्ये कधीच न होवो अशा शब्दात पुणेकरांकडून मनस्ताप व्यक्त केला जात आहे.
सुस येथील तीर्थ फील्ड्स येथे अरिजित सिंह यांच्या लाइव्ह कॉन्सर्टचे रविवारी (ता. १७) आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकीकडे नेटकाऱ्यांनी सोशल मीडियावर त्याच्या उत्कृष्ट आणि मोहून टाकणाऱ्या गायनाबद्दल प्रशंसा केली तर दुसरीकडे कार्यक्रमादरम्यान निकृष्ट व्यवस्थापनामुळे पुणेकरांनी आयोजकांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.
कार्यक्रमासाठी अव्वाच्या सव्वा शुल्क आकारून देखील कुठेही पार्किंग, अतिशय कर्कश आणि मोठ्या आवाजात लावलेली साउंड सिस्टम, वाहतूक नियमनाचा उडालेला बोजवारा, प्रसाधनगृहांची कमतरता या गैरसुविधांमुळे आयोजकांवर पुणेकरांकडून रोष व्यक्त केला जात आहे. याबाबत पुणेकरांनी सोशल मीडियाचा सदुपयोग करत आयोजकांना चांगलेच धारेवर धरले आहे.
अशी गोंधळाची परिस्थिती होती...
सर्व काही गोंधळाचे वातावरण होते. मी स्वतः अनेक मुलींना सुमारे ३ किलोमीटरपर्यंत पायपीट करून, चप्पल हातात घेऊन चालत येताना पहिले. प्रसाधनगृह नसल्याने तरुण-तरुणी रस्त्यावरच लघुशंका करत होते.
- प्रत्यक्षदर्शी तरुणी
कॉन्सर्टच्या दरम्यान रस्त्यावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बाणेरहून कॉन्सर्ट असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी मला तब्बल २ तासांचा कालावधी लागला. कार्यक्रमासाठी निवड केलेले ठिकाणच मुळात चुकीचे होते. सुस भागात सध्या रस्ते आणि कन्स्ट्रक्शनचे मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. याठिकाणी पायाभूत सुविधाही नाहीत अशा ठिकाणी या कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते.
- प्रत्यक्षदर्शी तरुण
फेरीवाले, वाहतूक कोंडी आणि गाड्या पार्क करण्यासाठी स्थानिक लोकांकडून अव्वाच्या सव्वा पैसे उकळले जात होते. त्याठिकाणी पोलिसांचा फौजफाटा अत्यल्प प्रमाणात होता आणि उपस्थित असलेले पोलिसही तितकेच गोंधळलेले होते.
- प्रत्यक्षदर्शी
एका तिकिटासाठी १० हजार रुपये देऊन गाडी पार्किंगसाठी ३०० ते ५०० रुपये द्या, अशी मागणी करण्यात येत होती. स्टेजजवळ उभे असलेल्या बाउन्सरकडून तेथे उभे राहण्यासाठी पैसे उकळले जात होते. शेवटी नाईलाजाने मला गाडी जंगलात पार्क करावी लागली.
- प्रत्यक्षदर्शी