पुणे : पुणे व शिरूर लोकसभा मतदारसंघात मतदानादरम्यान वेगवेगळ्या कारणांनी ईव्हीएम बदलण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली. पुणे लोकसभा मतदारसंघात मतदानावेळी ३९ ईव्हीएम तर शिरूर लोकसभा मतदारसंघात १८ ईव्हीएम बदलण्यात आले, तर मावळ लोकसभा मतदारसंघात मतदानावेळी १२ ईव्हीएम बंद पडले. त्यामुळे मतदारांना मतदानासाठी ताटकळत उभे राहावे लागले.
ईव्हीएम, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्रे उष्णतेला संवेदनशील असल्याने ते बंद पडण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडत आहेत. पुणे व शिरूर मतदारसंघासाठी सोमवारी प्रत्यक्ष मतदानाला सकाळी ७ वाजता सुरुवात झाली. मात्र, त्यापूर्वी झालेल्या मॉक पोलमध्येदेखील ही तिन्ही यंत्रे बंद पडल्याचे प्रकार समोर आले. पुणे लोकसभा मतदारसंघात मॉक पोलदरम्यान ३७ ईव्हीएम १४ कंट्रोल युनिट आणि १७ व्हीव्हीपॅट यंत्र बंद पडली. तर प्रत्यक्ष मतदानावेळी ३० ईव्हीएम, १० कंट्रोल युनिट व १९ व्हीव्हीपॅट यंत्रे बंद पडल्याचे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
शिरूर मतदारसंघातदेखील लोकसभा यंत्रे बंद
पडल्याचे प्रकार घडले आहेत. प्रत्यक्ष मतदानाला सुरू सुरुवात होण्यापूर्वी मॉक पोल दरम्यान २४ ईव्हीएम, १० कंट्रोल युनिट, २७ व्हीव्हीपॅट यंत्र बंद पडले होते. मतदानाला सुरुवात होण्यापूर्वीही बंद पडलेली यंत्रे बदलण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष मतदानावेळी १८ ईव्हीएम, ६ कंट्रोल युनिट व १८ व्हीव्हीपॅट यंत्रे बंद पडल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ईव्हीएम तसेच अन्य यंत्रे बंद पडल्यामुळे मतदारांना सुमारे अर्धा ते पाऊण तास मतदान केंद्रांवर ताटकळत उभे राहावे लागले यंत्रे सुरू झाल्यानंतर पुन्हा मतदानाला सुरुवात झाली, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मावळ लोकसभा मतदारसंघात मतदानापूर्वी झालेल्या मॉक पोलमध्ये २५ ईव्हीएम, ६ कंट्रोल युनिट व १४ व्हीव्हीपॅट यंत्रे बंद पडल्याचे सांगण्यात आले. तर प्रत्यक्ष मतदान वेळी १२ ईव्हीएम, ४ कंट्रोल युनिट व २५ व्हीव्हीपॅट यंत्रे बंद पडल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी सांगितले.