पुणे: राहणे व जेवणाची सोय असते म्हणून गरीब विद्यार्थी शिक्षणासाठी गावाबाहेर पडण्याचे धाडस करतात. शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतल्यानंतर या विद्यार्थ्यांना सुविधांऐवजी विविध समस्यांचाच सामना करावा लागत आहे. जेवणाचा दर्जा सुधारून न्याय मिळणार का, असा प्रश्न सामाजिक न्याय विभागाच्या विश्रांतवाडी येथील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी विचारत आहेत.
विश्रांतवाडी येथील युनिट एक, संत ज्ञानेश्वर व कोरेगाव पार्क या मागासवर्गीय मुलांचा शासकीय वसतिगृहातील जेवणाचा दर्जा दिवसेंदिवस घसरत चालला आहे. नाश्ता आणि जेवणही वेळेवर मिळत नाही. स्वयंपाकगृहात स्वच्छतेचा अभाव आहे. दर महिन्याला दिला जाणारा भत्ताही वेळेवर मिळत नाही. याबाबत तक्रार केली असता मीसुद्धा हेच जेवण खातो, असे सांगितले जात असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
वसतिगृहातील समस्या
- स्वयंपाकगृहात अस्वच्छता- जेवणाचा दर्जा नाही- नियमांप्रमाणे जेवणात मेनू नाहीत- पाण्याची सोय नाही- वेळेवर नाश्ता मिळत नाही
प्रतिविद्यार्थी मिळतात ४८०० रुपये
सामाजिक न्याय विभागातील वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी जेवणासाठी ४८०० रुपये दिले जातात. यात नाश्ता, दूध, चहा, दोन वेळचे जेवण आदींचा समावेश असताे. त्याच जेवणात पापड, लोणचे, सॅलेड, रविवारी चिकन/मटण, शुक्रवारी अंडाकरी असा समावेश आहे.
वेळेत मिळेना नाश्ता
येथील विद्यार्थी इयत्ता अकरावी व बारावीच्या वर्गातील आहेत. सकाळच्यावेळी महाविद्यालय असल्याने वसतिगृह सकाळी ६ वाजताच सोडावे लागते. येथे सकाळचा नाश्ता ७ वाजता दिला जातो. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना नाश्ता न करताच महाविद्यालयाला जावे लागते. यात त्यांची उपासमार हाेते.
विद्यार्थी म्हणतात...
वसतिगृहाच्या गृहप्रमुखाकडे तक्रारी घेऊन जाताे तेव्हा ते सगळं काही तर ठीक आहे, असे म्हणतात. मग आम्ही कोणाकडे दाद मागायची, असा प्रश्न आम्हा विद्यार्थ्यांना पडला आहे. - नामदेव येरकलवाड, विद्यार्थी.
निकृष्ट जेवण देणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी; अन्यथा आंदोलन करण्यात येईल. - मारोती गायकवाड, महाविद्यालयीन विद्यापीठ प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार नाश्ता आणि जेवण मिळेल
येथील वसतिगृहात चारशे विद्यार्थी असतात. प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. त्याप्रमाणे जेवण देणे शक्य नाही. जेवणाचा दर्जा चांगला आहे. काही तक्रार असेल तर त्याची नाेंद घेऊन आवश्यक सुधारणा केली जाईल. नाश्ता वेळेत मिळत नसेल तर विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार सकाळी लवकर दिला जाईल. - संतोष जैन, गृहप्रमुख, शासकीय वसतिगृह, पुणे.