पुणे : शहराच्या वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात वाहनांची संख्याही फुगत चालल्याचे चित्र आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे दररोज सुमारे ७०० ते एक हजार ते दीड हजार नवीन वाहनांची नोंद होत आहे. हा वेग कायम राहिल्यास मार्चअखेरपर्यंत शहरातील सर्व प्रकारच्या वाहनांची संख्या ४० लाखांच्या घरात जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे दुचाकी वाहनांचे प्रमाण सर्वाधिक आहे.देशात राहण्यायोग्य शहरांमध्ये पुणे शहर आघाडीवर आहे. नोकरी, रोजगार, शिक्षणासाठी पुण्याला पसंती देणााऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. शहराची लोकसंख्या जवळपास ३९ लाखांच्या घरात गेली आहे. त्याच वेगाने वाहनसंख्या वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. आरटीओच्या माहितीनुसार मार्च २०१७ अखेरपर्यंत एकूण नोंदणीकृत वाहनांची संख्या ३३ लाख ३७ हजार ३७० एवढी होती. ही संख्या सप्टेंबरअखेरपर्यंत ३७ लाख ६० हजारांपर्यंत गेली. त्यामध्ये दुचाकी वाहनांचा आकडा जवळपास २८ लाख एवढा, तर चारचाकी वाहनांचा सुमारे पावणेसात लाखएवढा होता. दररोज सुमारे ७०० ते एक हजार वाहनांची भर पडत आहे.या वेगानुसार दर महिन्याला २२ ते २५ हजार वाहनांची नोंदणी आरटीओकडे होत आहे. त्यानुसार जानेवारीअखेरपर्यंत वाहनांनी ३८ लाख ५० हजारांचा टप्पा पार केला आहे. हाच वेग कायम राहिल्यास मार्चअखेरपर्यंत ही संख्या ४० लाखांच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे. मागील काही महिन्यांत शहरात प्रवासी कॅबची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थित खिळखिळी असल्याने प्रवाशांचा ओढा कमी होऊ लागला आहे. तसेच अनेक रिक्षाचालकांकडून चांगला प्रतिसाद मिळत नसल्याने अनेक पुणेकर खासगी कॅबचा करू लागले आहे.ही संख्या झपाट्याने वाढत चालल्याने आरटीओकडे आतापर्यंत सुमारे ३२ हजार कॅबची नोंद झाली आहे. मार्च २०१७ मध्ये ही संख्या २२ हजाराच्या घरात होती. तसेच रिक्षा परवाने खुले करण्यात आल्याने रिक्षांचे प्रमाणही वेगाने वाढत चालले आहे.पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामती कार्यालयांतर्गत दररोज सुमारे दीड हजार वाहनांची नोंदणी होत आहे. त्यामध्ये १२०० दुचाकींचा समावेश आहे, तर ३०० वाहने चारचाकी आणि २०० कॅब, टुरिस्ट टॅक्सी, आॅटो रिक्षा, मालवाहू आदी वाहने आहेत.- बाबासाहेब आजरी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे विभाग
लोकसंख्येप्रमाणेच फुगतेय वाहनसंख्या, दररोज ७०० ते हजार वाहनांची भर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 2:42 AM