भोर / डिंभे : मे महिना उजाडला, की जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रातील नागरिकांना पाणी-पाणी करण्याची वेळ येते. यंदा तर दरवर्षीपेक्षा कमी पाणीसाठा धरणात शिल्लक आहे. त्यामुळे भाटघर, नीरा व कुकडी प्रकल्पातील पाणलोट क्षेत्रातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. आमच्या हक्काच्या पाण्यासाठी आम्हाला संघर्ष का करावा लागतोय, असा सवाल येथील जनता करीत आहे. पुरंदरमधील वीर धरणात ४०.४४ टक्के म्हणजे निम्मा पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पूर्व भागातील शेतकऱ्यांना वीरच्या कालव्याद्वारे ३१ मेपर्यंत शेतीला पाणी मिळणार आहे. मात्र धरण असणाऱ्या भोर तालुक्यातील शेतीला तर सोडाच पिण्याच्या पाण्याची टंचाई सुरूझाली आहे. मे महिन्यात त्याची तीव्रता अधिक वाढणार आहे. भोरचा वापर फक्त पाणी साठवण्यासाठीच केला जातो काय, असा सवाल होत असून, पुढील काळात भोर, वेल्हाचे पाणी पेटणार अशीच अवस्था आहे. हीच परिस्थिती कुकडी प्रकल्पातील पाणलोट क्षेत्रात आहे. या प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पाचही धरणांच्या पाणीसाठ्यात सध्या झपाट्याने घट होऊ लागली आहे. आजमितीस या प्रकल्पात केवळ २५ टक्के एवढा अत्यल्प पाणीसाठा आहे. ७.६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी या प्रकल्पात १२ टीएमसी म्हणजेच ३९ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. शिल्लक पाणीसाठ्याचा काटकसरीने व नियोजनपूर्वक वापर न झाल्यास यंदा उन्हाळ्याच्या अखेरच्या दिवसांत पाणीटंचाईची समस्या गंभीर रूप धारण करणार असून, वाढती पाण्याची मागणी व उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता कुकडी प्रकल्पातील पाण्याची पळवापळवी होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पाण्याच्या ओढाताणीमुळे धरण पाणलोट क्षेत्रातील पाणी योजना धोक्यात येणार आहे. धरणाच्या आतील गावांना यंदा तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. भरलेली धरणे पुन्हा रिकामी होतात आणि दरवर्षी भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील नीरा देवघर व भाटघर धरण खोऱ्यात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई जाणवते. आमच्या पाण्यावर पूर्व भागातील तालुक्यातील शेती पिकून शेतकरी सुखी होत असताना आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते, हे आमचे दुर्दैव असल्याचे बोलले जात आहे.