पुणे : कल्याणी नगर अपघात प्रकरणामध्ये पोलिस प्रशासनावर सर्वच पातळीवरून टीका झाली आणि संबंध राज्याचे या प्रकरणाकडे लक्ष लागले. या प्रकरणात येरवडा पोलिसांकडून निष्काळजीपणा झाल्याची कबुली स्वत: पाेलिस आयुक्तांनीच दिली. अपघातानंतर अग्रवाल कुटुंबीयांकडून बाळाच्या ऐवजी ड्रायव्हरच पोर्शे कार चालवत असल्याचा बनाव केला गेला, मात्र ते बाळच गाडी चालवत असल्याचे भक्कम पुरावे आमच्याकडे आहेत, असे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पिझ्झा दिल्याचे दिसून येत नाही येरवडा पोलिसांकडून या प्रकरणामध्ये निष्काळजीपणा झाला, असे पुराव्यांवरून दिसून येते. त्यावर आम्ही लवकरात लवकर कारवाई करणार आहोत. तसेच हे प्रकरण दाखल होतानाच यात ३०४ कलम का लावले नाही?, आरोपीला पिझ्झा खाण्यासाठी दिला का? याबाबतची चौकशी सुरू आहे. प्राथमिक पुराव्यांनुसार, अशी पिझ्झा पार्टी झाल्याचे दिसून येत नाही, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले...- कल्याणी नगरमध्ये मध्यरात्री अपघात घडल्यानंतर सकाळी आठ वाजेच्या सुमारास पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात ‘३०४ अ’ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य पाहता त्यानंतर ‘३०४’ हे कलम वाढवण्यात आले. जे अजामीनपात्र असून, त्यात १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.
- आरोपीला सज्ञान म्हणून वागणूक मिळावी, अशी मागणी आम्ही त्याच दिवशी बाल न्याय मंडळाकडे केली होती. मात्र, ती मागणी मान्य करण्यात आली नाही. त्यानंतर पुढच्या न्यायालयात जाण्याचा निर्णय आम्ही घेतला.
- दुसरीकडे आम्ही त्याच दिवशी आरोपी मुलाच्या वडिलांवर आणि पब मालकांवरही गुन्हा दाखल केला तसेच त्यांना अटकदेखील केली. आरोपी बाळाची बालसुधारगृहात रवानगी करण्यासाठी बाल न्याय मंडळाकडे मागणी केली आणि ती मान्य झाली. त्यानंतर बाळाची १४ दिवसांसाठी बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
- अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला सज्ञान म्हणून ग्राह्य धरण्यासाठी बाल न्याय मंडळाकडे आमची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा तपास अत्यंत संवेदनशीलपणे केला जात असून, त्यात पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का? याचाही तपास सुरू आहे. त्यात पीडितांना लवकरात लवकर न्याय देण्याचा आणि आरोपींना शिक्षा मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. या प्रकरणात न्यायालयात योग्य ती बाजू मांडण्यासाठी आम्ही उपाययोजना करत आहोत.
- आरोपीच्या पालकाने अल्पवयीन मुलाला गाडी चालवण्यास दिली, याचाही तपास सुरू असून, या प्रकरणात कारवाई करण्यास दिरंगाई झाली किंवा कोणी मॅनेज झाले का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, आम्ही ठामपणे सांगू शकतो की, अशा प्रकारच्या घटनांत कायद्याच्या मार्गावर आम्ही काम करतो आहाेत.
दोनदा घेतले ब्लड सॅम्पल आरोपी बाळाचे ब्लड रिपोर्ट अजूनही न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून आलेले नाहीत. सुरुवातीला बाळाचे ब्लड सॅम्पल घेतले होते. त्यानंतर दुसऱ्यांदा सॅम्पल घेतले. फॉरेन्सिक लॅबला सांगितले आहे की, दोन्ही सॅम्पल आरोपीचे आहेत की नाही, याची खात्री करावी तसेच ब्लड रिपाेर्टमुळे आमच्या तपासावर परिणाम होणार नाही. कारण, बाळ मद्य पित असतानाचे फुटेज आमच्याकडे आहे. बाळ शनिवारी घरून गाडी घेऊन जात असताना वॉचमनच्या रजिस्टरमध्येही बाळच गाडी चालवत गेल्याचे लिहिले आहे, असेही ते म्हणाले.
बारकाईने तपास एकेका घटनेचा बारकाईने तपास पोलिस करत आहेत. त्यात गाडीचा ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न झाला, ही बाब आमच्या चौकशीत समोर आली. कारचा अपघात घडला तेव्हा कारमध्ये चार लोक होते. त्यावेळी बाळच गाडी चालवत होता. अजून दोन मुले गाडीत होती आणि एक ड्रायव्हर होता. ज्या पबमध्ये पार्टी झाली, त्यावेळी आणखी सात ते आठ लोक तेथे होते. त्यातील ड्रायव्हरचा जबाब महत्त्वाचा असून, तो ग्राह्य धरण्यात येईल, असेही पाेलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले.