पुणे : पोर्शे कार अपघातात आमदार सुनील टिंगरे यांनी काहीही केलेले नाही. जो काही चुकीचा तपास झाला तो अधिकाऱ्यांनी केला असून, त्यांच्यावर कारवाई होत आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार टिंगरे यांची पाठराखण केली. या प्रकरणात आयुक्तांना फोन केलेला नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
एका कार्यक्रमानिमित्त शनिवारी सकाळी अजित पवार पुण्यात आले होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी पोर्शे कार अपघात प्रकरणात कोणीही कसलाही हस्तक्षेप करत नाही, सरकारने हा अपघात व त्याचा तपास गंभीरपणे घेतला आहे, असा दावा केला. तसे नसते तर अपघात झाल्यावर दुसऱ्याच दिवशी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात आले नसते. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ परदेशात होते. तिथून आल्यावर त्यांनी लगेच माहिती घेतली आणि ससूनमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई केली, असेही अजित पवार म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: या तपासावर लक्ष ठेवून आहेत. अपघात प्रकरणात जे काही झाले ते अधिकाऱ्यांकडून झाले आहे. तपासकामात ते पुढे येत आहे, लगेच त्यांच्यावर कारवाईदेखील केली जात आहे. त्यामुळे यात राजकीय हस्तक्षेप होतो आहे या म्हणण्यात तथ्य नाही, असेही अजित पवार म्हणाले.
पवार म्हणाले की, आमदार हा लोकप्रतिनिधी असतो. अशा काही घटना घडल्यानंतर तिथे जाणे हा त्याच्या कामाचाच भाग आहे. टिंगरे यांनी तपासकामात हस्तक्षेप केला, पोलिसांवर दबाव आणला असे काही झाले आहे का? यात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होत आहे. मुलगा, वडील व आजोबांनाही अटक झाली, त्यांचा तपास सुरू आहे. आज मुलाच्या आईलाही ताब्यात घेतले आहे, इतके सगळे होत असताना राजकीय दबाव आहे, असे कसे म्हणता येईल? असा प्रतिप्रश्नही पवार यांनी केला.
अपघात झाल्यानंतर मी पोलिस आयुक्तांना फोन केलेला नाही. ते कुठे होते, मी कुठे होतो कोणाला माहिती नाही आणि लगेचच मी फोन केला असे म्हटले जाते. फोन केलेलाच नाही व केला असता तरीही योग्य पद्धतीने तपास करा, कोणाचीही गय करू नका, असेच सांगितले असते. मागील ३२ वर्षांच्या राजकारणातही हेच सांगत आलो आहे, असे पवार म्हणाले. पोर्शे कार अपघात प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने सुरू आहे, त्यातून अनेक गोष्टी पुुढे येत आहेत, पोलिस त्याप्रमाणे कारवाई करत आहेत, असा दावा पवार यांनी केला.
शिफारस प्रकरणीही अधिकारी जबाबदार :
डॉ. तावरे यांची शिफारस टिंगरे यांनीच केली होती, असे लक्षात आणून दिल्यानंतर पवार म्हणाले, आमदार त्यांची कोरी लेटरहेडस स्वीय सहायकाकडे ठेवून देतात. त्यावर स्वाक्षरी केलेली असते. हे चूक आहे, मात्र तसे केले जाते, मी स्वत:ही अशी लेटरहेडस ठेवली आहेत. आम्ही बदली, बढतीसाठी शिफारस करतो, ते योग्य आहे किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची असते, असे सांगत अजित पवार यांनी शिफारशीचाही दावा खोडून काढला.