पुणे : कल्याणीनगर अपघातातील पोर्शे गाडीची नोंदणी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे नसतानाही ती रस्त्यांवरून चालवली जात होती. तसेच, अपघातावेळी वाहनचालक अठरा वर्षांपेक्षा कमी वयाचा असल्याने या कारची नोंदणी रद्द करण्यात आली असून, संबंधित कारचालकाला वयाच्या २५ व्या वर्षांपर्यंत वाहन परवाना देण्यात येणार नाही, अशी माहिती राज्याचे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी दिली. ‘बाळ’ १८ वर्षांचा नसतानाही त्याला कार दिल्यामुळे बाळाच्या बापालाही ३ वर्षांची शिक्षा होऊ शकते. त्यामुळे अग्रवालच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
कल्याणीनगर येथे बेदरकारपणे गाडी चालवून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याचा ‘बाळ’ सज्ञान नसतानाही गाडी चालवत होता. याबाबत भीमनवार म्हणाले, ‘मुळात ही कार प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्थात आरटीओकडे नोंदणीकृत झालेली नव्हती. ही कार बंगळूरहून एका एजंटने अग्रवालकडे सुपूर्द केली होती. त्यासाठी तात्पुरती नोंदणी करण्यात आली होती. त्यानंतर पुणे आरटीओकडे ही गाडी आल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करून ती संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले. कारची पाहणी केल्यानंतर ऑनलाइन प्रक्रियेनुसार त्यांना नोंदणीसाठी १ हजार ७५८ रुपयांचे शुल्क भरण्यास सांगितले होते. यात १ हजार ५०० रुपये हायपोथेकेशन फी, स्मार्ट कार्डसाठी २०० रुपये व ५८ रुपये टपाल खर्च समाविष्ट होते.”
मात्र, आरटीओकडील माहितीनुसार अग्रवाल याने हे शुल्क भरलेच नव्हते. हे शुल्क भरल्यानंतरच आरटीओकडून अंतिम नोंदणी केली जाते व त्यानंतर त्या गाडीला क्रमांक दिला जातो. गाडीची क्रमांक नोंदणी नसतानाही ती रस्त्यावरून धावत असल्यास संबंधित चालकाला दंड ठोठावण्यात येतो. यात कोणताही गुन्हा दाखल होत नाही. मात्र, या प्रकरणात चालक हा अल्पवयीन असल्याने तसेच अपघातामुळे दोघांचा मृत्यू झाल्याचे एफआरआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे गाडीची नोंदणी एका वर्षासाठी स्थगित करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती भीमनवार यांनी या वेळी दिली. त्यामुळे पुढील वर्षभर ही गाडी कोणीही चालवू शकणार नाही. तसेच, अल्पवयीन कारचालकाला वयाच्या २५ व्या वर्षांपर्यंत वाहन परवाना देण्यात येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. गाडीचालक अल्पवयीन असतानाही त्याच्या वडिलांनी त्याला गाडी चालवण्यास दिल्याचे स्पष्ट झाल्यास त्यांनादेखील गुन्ह्यात प्रतिवादी करण्यात आले आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास तीन वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते, असेही ते म्हणाले.
पुणे आरटीओने वाहनाच्या नोंदीसंदर्भातील प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पाडलेली होती. त्याची पडताळणीदेखील केली होती. मात्र, शुल्क न भरल्याने गाडीची अंतिम नोंदणी झाली नव्हती. त्यामुळे तात्पुरती नोंदणी एका वर्षासाठी रद्द करण्यात आली आहे.
विवेक भीमनवार, आयुक्त, परिवहन