किरण शिंदे
पुणे: पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. दररोज समोर येणाऱ्या घटनेने सर्वांना चक्रावून टाकले आहे. याप्रकरणात आता नव्याने माहिती समोर आली आहे. अपघात घडल्यानंतर अल्कोहोल चाचणी करण्यासाठी अल्पवयीन कार चालकाला ससून रुग्णालयात आणण्यात आले होते. तेथे त्याचे ब्लड सँपल घेण्यात आले होते. मात्र ऐनवेळी त्या ठिकाणी आलेल्या खासगी व्यक्तीने या ब्लड सँपलची अदलाबदली केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे ऐनवेळी रुग्णालयात आलेले हे खासगी इसम कोण? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनसार, ससून रुग्णालयातील संबंधित विभागातील डॉक्टरांनी अल्पवयीन कार चालकाचे ब्लड सँपल घेतले होते. मात्र ऐनवेळी आलेल्या खासगी इसमाने संबंधित डॉक्टरांवर दबाव टाकत हे ब्लड सँपल बदलण्यास भाग पाडले आणि स्व:त सोबत आणलेले ब्लड सँपल त्या ठिकाणी ठेवले. त्यामुळे त्या दिवशी ससून रुग्णालयात आलेले ते खासगी इसम कोण? कुणाच्या सांगण्यावरून ते रुग्णालयात आले होते? रुग्णालयातील डॉक्टरांवर त्यांनी दबाव का टाकला? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत.
दरम्यान या प्रकरणात अल्पवयीन मुलाचे ब्लड सँपल बदलणाऱ्या ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर या दोघांना अटक करण्यात आलीय. अपघातानंतर या अल्पवयीन कारचालकाला मेडिकल टेस्टसाठी ससून रुग्णालयात आणण्यात आले होते. यावेळी या मुलाचे ब्लड सँपल बदलण्यात आले. पोलिसांनी इतर लँबमध्ये या मुलाचं डीएनए टेस्टिंग केल्यावर हे बिंग फुटले. इतकेच नाही तर आरोपी डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाचे ब्लड सँपल घेऊन ते कचऱ्याच्या डब्यातही फेकून दिल्याचे समोर आले आहे.