पुणे : कल्याणी नगर येथील पोर्शे कारअपघात प्रकरणानंतर ‘बाळा’ची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली, तर ‘बाळा’चे वडील विशाल अग्रवाल याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. गुरुवारी पोलिसांचे पथक विशाल अग्रवाल याला बरोबर घेऊन त्याच्या घराची झाडाझडती घेण्यासाठी गेले होते. यावेळी विशाल अग्रवाल वापरत असलेला मोबाइल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ‘बाळा’कडून गुन्हा घडला, त्यावेळी ‘बाळा’चा बाप घरातच होता. मात्र, त्याने पोलिसांना शिर्डीला असल्याची बतावणी केली होती. त्यामुळे झाडाझडती घेतल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
‘बाळा’चे आजोबा सुरेंद्रकुमार अग्रवाल यालादेखील पोलिस जबाबासाठी म्हणून घरातून पोलिस आयुक्तालयात घेऊन आले होते. या प्रकरणी त्याने नातवाला वाहन चालवण्यासंदर्भात मुभा दिली होती का, याबाबत पोलिसांनी चौकशी केली. पोलिसांनी त्याला दिवसभर पोलिस आयुक्तालयात बसवले होते.
‘बाळा’ने ड्रग्ज घेतल्याची चर्चा- अल्पवयीन मुलाने ड्रग्जचे सेवनदेखील केले असल्याची चर्चारंगत आहे. - अजून ‘बाळा’चा रक्ताचा अहवाल आला नसल्याने त्यावर अधिकृत भाष्य पोलिस करू शकत नसले, तरी पबमध्ये मद्यसेवन करत असताना व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ‘बाळा’चे एक कृत्य ड्रग्ज सेवन करतानाचे असल्याचे बोलले जात आहे.
अश्लील शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल- या घटनेच्या अनुषंगाने, सोशल मीडियावर गुरुवारी दुपारी ‘मी बिल्डरचा मुलगा आहे, माझ्या मागे का लागता,’ अशा आशयाचा अश्लील भाषेत असलेला व्हिडीओ व्हायरल झाला. - मात्र, पोलिसांनी संबंधित व्हिडीओमधील मुलगा जरी या अपघात प्रकरणाबाबत बोलत असला तरी तो मुलगा आरोपी ‘बाळ’ नसल्याचे स्पष्ट केले.
अग्रवालबरोबर असलेल्या व्यक्तीची पत्रकारांशी अरेरावी -- पोलिस आयुक्तालयात ‘बाळा’च्या आजोबाला एका केबिनमधून चौकशीसाठी दुसरीकडे नेण्यात आले. - यावेळी ‘बाळा’च्या आजोबाची, त्याच्या मुलाची (विशाल अग्रवाल) आणि चालकाची समोरासमोर बसून चौकशी करण्यात आली.- यावेळी सुरेंद्रकुमार अग्रवाल याच्याबरोबर असलेल्या एकाने स्वत:ला वकील असल्याचे सांगून पत्रकारांशी अरेरावीची भाषा केली. - याआधी त्याच व्यक्तीने पत्रकार बाजूला असल्याचे लक्षात येताच, ‘हे कोण गरीब लोक आहेत, यांना अग्रवाल कोण आहे, याची कल्पना आहे का?, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना फोन केला, तर सगळे सॉल्व्ह होईल, त्यांच्या नादी का लागत आहेत?’ असे वक्तव्य केले होते. - यानंतर संध्याकाळी परत त्याने पत्रकारांशी अरेरावी केली व पत्रकारांच्या अंगावर धावून गेला.