पुणे : बड्या बापाचा पोरगा आहे, त्याला कसली शिक्षा होतेय, तो अलगद सुटून बाहेर येणार... पैसेवाला बाप असल्याने पोरगा बिघडलाय, कठोर शिक्षा द्यायलाच हवी त्याला... अल्पवयीन आहे म्हणून काय झालं, दोन तरुणांचे प्राण घेतलेत त्याने... कारागृहात टाका मग डोकं ठिकाणावर येईल.... अशा प्रकारे सोशल मीडियावर नागरिकांनी कोरेगाव पार्क येथे झालेल्या अपघातावर संताप व्यक्त केला.
पुण्यात अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनांची संख्या देखील प्रचंड वाढली असून, सर्व रस्त्यांवर गर्दीच गर्दी होत आहे. प्रत्येकाला पुढे जायचे आहे. दुसरीकडे श्रीमंत घरच्या पोरांना तर मोठ्या गाड्या वेगाने चालवायची नशाच असते. त्याच नशेमधून कल्याणीनगर येथील अपघात झाला आणि एक तरुण, एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला. या घटनेवर सोशल मीडियावर नागरिकांनी चांगलाच राग व्यक्त केला.
मृत व्यक्तीच्या परिवाराने उच्च न्यायालयात दाद मागितली पाहिजे. कारण न्यायालयाने दिलेला निर्णय प्रथमदर्शनी योग्य वाटत नाही. निबंध लिही, वाहतूक नियमन कर हे काय शिक्षा झाली का? अहो, त्याचा बाप अब्जाधीश आहे, तो बळच तरी ही शिक्षा पूर्ण करेल का?
- अनिकेत राठी
अपघात झाला की, त्यानंतर तो खटला खूप दिवस चालतो. ही आहे भारताची न्याय प्रणाली आणि आता १५-२० वर्षे तो खटला चालेल, मग निर्दोष मुक्ततासुद्धा होईल.
- मणी पानसे
सध्या पुण्यात दिवसेंदिवस गाडी चालवणं फार कठीण व्हायला लागलं आहे, तुमची चूक नसतानाही तुम्हाला उडवलं जाऊ शकतं, कालच रात्री काही कारणानं उशिरा दुचाकीवरून यावं लागलं, तेव्हा काही दुचाकीवाले लोक भरधाव गाडीवरून जात असलेले दिसले आणि काळजाचा ठोकाच चुकला.
- सुप्रिया खोत
कायद्यात पूर्वी अपघाताला फार महत्त्व दिले गेले नाही, त्यातील कलमे जामीनपात्र आहेत. आता असे अपघात होऊ लागल्याने आपल्याला त्याचे गांभीर्य लक्षात आले; पण अजून कायद्याला आले नाही, ते नव्या कायद्यात येईल, यात पैसेवाल्याचा मुलगा म्हणून इतकी टीका व अधिक लक्ष घातले गेले. शहरात घडणाऱ्या अनेक अपघातात याच्या जवळपास जाणारी परिस्थिती असते. कोणी त्यात बारकाईने पाहत नाही म्हणून ते सर्वांना माहिती होत नाही.
- एक नेटिझन
श्रीमंत-गरीब हा भेदभाव न करता कठोरात कठोर शिक्षा द्यावी, जेणेकरून भविष्यात कोणीही असे करणार नाही. पालकांनी आपल्या लहान मुलांना वाहने देताना शंभर वेळा विचार केला पाहिजे.
- सलीम शेख