पुणे - कलेच्या माध्यमातून समाजात आणि देशात सकारात्मक बदल घडविण्याचे काम तरुणाई करताना दिसत आहे. अशा तरुणाईला व्यासपीठ मिळवून देणे आवश्यक आहे. सतत काही तरी नावीन्याचा ध्यास असणारी पिढी उद्याच्या कला जगतावर आपली मोहोर उमटविण्यासाठी नक्कीच सक्षम आहे, असा आशावाद मृणाल कुलकर्णी यांनी व्यक्त केला.स्टारविन्स एंटरटेनमेंट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘क्षण’ छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाट्न अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते झाले, त्या वेळी त्या बोलत होत्या. एअर कमोडोर अशोक शिंदे, छायाचित्रकार-रंगभूषाकार अतुल सिधये, अभिजित मुथा, प्रणव तावरे, राज लोखंडे, गुणेश दुणाखे आणि प्रथमेश खारगे आदी या वेळी उपस्थित होते.यानिमित्ताने चित्रकार चिंतामणी हसबनीस, क्रीडाप्रशिक्षक अजय कुलकर्णी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, अखिल मंडई म्हसोबा उत्सव ट्रस्टचे अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, उपाध्यक्ष निवृत्ती जाधव व माध्यम छायाचित्रकार अरुल होरायझन यांना त्यांच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी क्षण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.युवा छायाचित्रकार जयेश दुणाखे यांच्या स्मरणार्थ आयोजित या प्रदर्शनात देशभरातील ६५ छायाचित्रकारांची सुमारे २२० छायाचित्रे रसिकांना पाहाता येणार आहेत.हे प्रदर्शन रविवारपर्यंत (दि. २४) सहकारनगर येथील वसंतराव बागुल उद्यानाच्या पं. भीमसेन जोशी कलादालन सकाळी अकरा ते रात्री आठ या वेळेत पाहता येईल.भारतीय सैन्य दलात कॅमेरा आणि छायाचित्रण हा महत्त्वाचा भाग आहे. त्याद्वारेच शत्रू देशातील अनेक गोष्टींचा सुगावा लागतो आणि त्यातून मोठी मदत होते. छायाचित्रणाला कोणत्याही मर्यादा नसतात. म्हणूनच छायाचित्रणातून जे बोलता येते आणि टिपता येते, ते अमर्याद आणि अव्यक्त आहे.- अशोक शिंदे, एअर कमोडोर
कलेच्या माध्यमातून सकारात्मक बदल - मृणाल कुलकर्णी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 3:12 AM