सुषमा नेहरकर-शिंदे । पुणे : रोगनिदान झाल्याबरोबर उपाचर सुरू केले, नियमित तपासणी ठेवली आणि उपचारात सातत्य ठेवले तर एचआयव्ही एड्सग्रस्त रुग्ण सर्वसामान्य व्यक्तींसारखे आयुर्मान जगू शकतो. यामध्ये शासनाच्या ‘एआरटी’चा ( अँटी रेट्रो व्हायरल थेरपी) खूप मोठा वाटा आहे.भारतात सर्वांत प्रथम सन १९८६ मध्ये पहिला एचआयव्ही बाधित एड्सग्रस्त रुग्ण आढळून आला. त्यानंतर शासन तातडीने जागे झाले व १९८७ मध्ये ‘एड्स कंट्रोल’ कार्यक्रम हाती घेतला. शासनाने एड्स जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेतला, तरी याबाबत प्रचार आणि प्रसिद्धी कमी पडल्याने सन १९९६पर्यंत रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. देशात एकूण लोकसंख्येच्या ०.४१ टक्के लोकांना ही बाधा झाल्याची शासनाची अधिकृत आकडेवारी आहे. परंतु त्यानंतर देशभरात प्रचंड मोठ्या प्रमाणात जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला. एड्स नियंत्रण केंद्राची स्थापना करण्यात आली. या माध्यमातून एचआयव्हीचा धोका जास्त असणाऱ्या सर्व व्यक्तींची तपासणी, बाधित व्यक्तींचे सातत्याने आणि विनाशुल्क उपचार, त्यांच्या संपर्कातील सर्व व्यक्तींची तपासणी, वारंवार समुपदेशन असे अनेक कार्यक्रम हाती घेतले. गर्भवती स्त्रिया, अतिदक्षता विभागीतल रुग्ण, रक्तपेढीमध्ये गोळा होणारे रक्त, शस्त्रक्रियेसाठी आलेले रुग्ण, डॉक्टर आणि सहकारी सर्वांच्या तपासण्या सुरू करण्यात आल्या.एचआयव्हीचा विषाणू प्रामुख्याने बाधित व्यक्तींच्या (सीडीफोर) लिम्फोसाइट या रक्तपेशीवरच हल्ला करतात. यामुळे संबंधित रुग्ण प्रतिकारशक्ती गमावून बसतो आणि अन्य प्रकारच्या जंतुसंसर्गाला बळी पडतो. यामुळे सुरुवातीला एचआयव्ही बाधित व्यक्तीचा मृत्यू प्रामुख्याने या सोबत येणाऱ्या क्षयरोग (टीबी), फंगल इन्फेक्शन, जुलाब यांसारख्या आराजांचे बळी ठरत होते. आता एड्सवर अनेक प्रभावी औषधे उपलब्ध झाली असून, नियमित उपचार व तपासणी केल्यास एचआयव्ही बाधित रुग्ण सर्वसामान्य नागरिकासारखे आयुष्य जगू शकतो.
जागतिक एडस दिन विशेषनव्याने लागण होण्याचे प्रमाण कमीदेशात गेल्या काही वर्षांत नव्याने एचआयव्हीची लागण होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु सध्या लागण होत असलेल्या एकूण रुग्णांपैकी ४० टक्के रुग्ण १८ ते २५ वयोगटातील आहेत, ही गंभीर बाब आहे. प्रयास हेल्थ गु्रपच्या वतीने राज्यात ६ जिल्ह्यांमध्ये एड्सबाबत काम केले जाते. येथे सुमारे दीड लाख गरोदर महिलांची तपासणी केली असता सुमारे २५० गरोदर मातांना एड्स असल्याचे निदर्शनास आले. या सर्व गरोदर महिलांची नियमित तपासणी व औषधोपचार केल्याने होणाऱ्या बाळाला एचआयव्हीची लागण होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करण्यात यश मिळत आहे. - डॉ. विनय कुलकर्णी, एड्सतज्ज्ञ
एचआयव्ही रुग्ण जास्त जगू लागलायएचआयव्ही बाधित रुग्णांसाठी सध्या बाजारात उपलब्ध असलेली औषधे, शासनाच्या ‘एआरटी’ ( अँटी रेट्रो व्हायरल थेरपी) उपक्रम आणि जनजागृती यामुळे हे रुग्ण अधिक जगू लागले आहेत. पूर्वी क्षयरोग, इन्फेक्शन, जुलाब यांसारखे आजार पूर्णपणे नियंत्रणात आले आहेत. यामुळे एचआयव्हीचे निदान झाल्यानंतर नियमित उपचार व तपासण्या केल्यानंतर रुग्ण पुढील किमान ३५ ते ४० वर्षे सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे आयुष्य जगू शकतो. एड्सग्रस्त रुग्णांचे आयुर्मान वाढल्याने या रुग्णांमध्ये कॅन्सर, हृदयविकार यांसारखे आजार होण्याचे प्रमाण वाढत आहे. - डॉ. अभिजित लोढा, रुबी हॉल क्लिनिक