पुणे : कोरोना चाचणीचे अवघ्या २४ तासांच्या आत उलट सुलट रिपोर्ट येण्याचा अनुभव एका पुणेकराला आहे. यातला नेमका कोणता रिपोर्ट ग्राह्य धरायचा या गोंधळात तो आता अडकला आहे. दरम्यान महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते असे गोंधळ होत असल्यानेच त्यांनी खासगी प्रयोगशाळांच्या ॲाडिटला सुरुवात केली आहे.
पुण्यातल्या बाणेर परिसरातल्या २३ वर्षांच्या एका विद्यार्थ्याला कामानिमित्ताने प्रवास करायचा होता. प्रवासासाठी कोरोना चाचणी बंधनकारक असल्याने त्याने घराजवळच्या एका खासगी प्रयोगशाळेत चाचणी करुन घेतली. त्याचा अहवाल पॅाझिटिव्ह आल्याने तो काळजीत पडला.
लोकमतशी बोलताना या युवकाने सांगितले “ माझी परीक्षा सुरु असल्याने मी घराबाहेर पडलो नव्हतो. तसेच इतर कोणाशीही माझा संबंध आला नव्हता. त्यामुळे टेस्ट पॅाझिटिव्ह आली कशी असा मला प्रश्न पडला. त्यामुळेच मी पुन्हा टेस्ट करुन घ्यायचे ठरवले”
पहिल्या टेस्ट चा रिपोर्ट आल्यानंतर अर्ध्या तासातच पुन्हा दुसऱ्या खासगी प्रयोगशाळेत स्वॅब दिला. या चाचणीचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला. चोवीस तासांत आलेल्या या उलट सुलट अहवालांमुळे यातला नेमका कोणता अहवाल खरा असा प्रश्न या युवकाला पडला आहे.
अशा स्वरुपाच्या अनेक तक्रारी येत असल्याचे महापालिकेच्या प्रभारी आरोग्य विभाग प्रमुख डॉ. अंजली साबणे याांचे म्हणणे आहे. असे प्रकार आणि तक्रारी येत असल्यानेच आम्ही प्रयोगशाळांचीच तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही तपासणी सुरु झाली असुन यामध्ये सर्व प्रोटोकॉल पाळले जात आहेत का नाही याची तपासणी केली जात आहे.” असेही त्यांनी सांगितले.