पुणे : पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मात्र काळजी करण्याचे कोणतेच कारण नसून, ४२ हजार २६४ सक्रिय रुग्णांपैकी (ॲक्टिव्ह रुग्ण) केवळ ३.४० टक्के रुग्णांनाच रुग्णालयात उपचाराची गरज भासली आहे़ एकूण बाधितांपैकी एका टक्क्यापेक्षाही कमी म्हणजेच ०.६० टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज लागत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. (pune corona cases)
सोमवारपासून शहरात सहा हजारांच्या पुढे नव्या कोरोनाबाधितांचा आकडा गेला आहे. गुरुवारी कोरोना आपत्तीत प्रथमच सर्वाधिक म्हणजे ७ हजार २६४ रुग्ण एकाच दिवशी आढळून आले आहेत. परंतु, यापैकी ९५ टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण हे लक्षणेविरहित तर अति सौम्य लक्षणे असलेले आहेत. यापैकी कोणालाही रुग्णालयात दाखल होण्याची गरज भासत नाही. किंबहुना जे रुग्ण सध्या विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत, त्यापैकी बहुतांशी रुग्ण हे वयोवृद्ध व सहव्याधी असलेले रुग्ण आहेत.
येत्या काही दिवसांत हजारापेक्षा जास्त रुग्ण
कोरोनाच्या नव्या विषाणूचा म्हणजेच ओमायक्रॉनचा संसर्ग झपाट्याने वाढत असला तरी, तो सामूहिक प्रतिकार शक्ती वाढविणाराच ठरत आहे. दिवसाला सहा-सात हजारांच्या पुढे होणारी रुग्णवाढ ही येत्या काही दिवसांत १० हजारांच्या पुढेही जाणार आहे. परंतु, हा वाढता संसर्ग आपल्याला आता खबरदारी घेऊन कोरोनासोबतच जगायचे आहे याचीच प्रचिती देत आहे.