लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाचा बुधवारी होणारा निर्णय लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी खबरदारी म्हणून सकाळपासून अतिरिक्त बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलिसांनी केलेल्या आवाहनाला मराठा समाजातील विविध संस्था आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर शहरात कोठेही अनुचित प्रकार अथवा आंदोलने झाली नाहीत, असे सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.
पोलिसांनी मराठा समजातील विविध संघटना आणि संस्थांच्या पदाधिकार्यांशी संपर्क ठेवला होता. व्यक्तिगत पातळीवर पोलिसांनी प्रत्येकाशी संवाद साधला. शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. अशा परिस्थितीत आंदोलने, निदर्शने करण्याची भूमिका योग्य नाही, असे आवाहन पोलिसांनी केले. पोलिसांच्या आवाहनाला मराठा संघटनांनी प्रतिसाद देऊन कोणतेही आंदोलनही करण्यात आले नाही, असे डॉ. शिसवे यांनी सांगितले.