पुणे : कोरोनामुळे अनेक संकटांना तोंड द्यावे लागले आहे. अशी अनेक संकटे आली असली, तरी धरती फाटली नसून ती सुरक्षित आहे. त्यामुळे हार मानून चालणार नाही. एक प्रेरणा मिळाली की उत्साह वाढतोच. नैराश्याने अथवा नकारात्मक विचारांनी मरगळ येते. मात्र सकारात्मक विचारांनी ऊर्जा मिळते, असे मत निवृत्त कॅप्टन श्यामराज ई. व्ही. यांनी व्यक्त केले.
सुरेंद्र पठारे फाउंडेशन आणि यूथ फाउंडेशन यांच्या सहयोगाने आयोजित संवाद तरुणांचा तरुणांसाठी या कार्यक्रमात ते बोलत होते. व्हिक्टोरिअस स्कूलचे संस्थापक अध्यक्ष व निवृत्त विंग कमांडर रॉबिन घोष यांनीही तरुणांशी संवाद साधला. माजी आमदार बापूसाहेब पठारे, मेजर शिवप्रिया श्यामराज, नगरसेवक भैयासाहेब जाधव, यूथ फाउंडेशनचे रोहन शेट्टी उपस्थित होते.
माईकची भीती वाटते. मात्र, बंदुकीची नाही असे सांगून श्यामराज म्हणाले की, प्रत्येकाच्या आयुष्यात एक मोठे स्वप्न असते. मात्र, जिद्द, चिकाटी असेल तर आयुष्याच्या कोणत्याही वळणार यश प्राप्त करता येते. ध्येय गाठताना यश-अपयश येतच असते. अपयश आले की आजची मुलं टोकाची पावले उचलतात. हार नमानता स्पर्धेला सामोरे गेले पाहिजे. ऑपरेशन पराक्रम मोहिमेच्या हल्ल्यात जखमी झालो. सोबत असलेल्या सहका-यांपैकी ९ सहकारी शहीद झाले. हे सहा महिन्यांनी समजले. काहीकाळ कोमामध्ये गेलो. तीन वर्षांनंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. हात-पाय सुरक्षित राहिले मात्र पायांवर उभे राहता येत नाही. कधी तरी उभे राहून चालेल या आशेवर जीवन जगत आहे. आईवडिलांसाठी जिवंत राहिलो हे नशीब समजून देवाचे आभार मानत असतो.
रॉबिन घोष म्हणाले की, एकविसाव्या शतकात भारत जगाचे नेतृत्व करेल, असे भाकीत स्वामी विवेकानंद यांनी केले होते. हे स्वप्न साकार करण्यासाठी आजच्या युवापिढीचा सहयोग महत्वाचा आहे. सत्यता, प्रामाणिकता, सेवाभावी वृत्ती जोपासावी. स्वामी विवेकानंद यांचे विचार युवकांना मार्गदर्शक आहेत. सकारात्मक दृष्टिकोनातून काम करत राहावे.
स्नेहा करमरकर आणि निखिल लिमये यांनी सूत्रसंचालन केले.
चौकट
नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन शिबिर घेणार
तरुणांना घडविण्यासाठी फाउंडेशन काम करणार आहे. प्रतिकूल परिस्थिती सुद्धा आपल्याला यश संपादन करता येते. याची प्रचिती यावी म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले. पुढील काळात रोजगार मेळावा, तसेच नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करणार असल्याचे सुरेंद्र पठारे यांनी सांगितले.
फोटो : निवृत्त कॅप्टन श्यामराज ई. व्ही. मार्गदर्शन करताना.