सध्याच्या भयावह स्थितीत हजारो, लाखो बाधितांना आदर्श ठरावा, असा कोरोनावर अशोक परशुराम माने या ज्येष्ठाने विजय मिळविला आहे.
हडपसर येथे कार कुशनचा व्यवसाय करणारे माने यांची ६ एप्रिल रोजी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यात त्यांच्या पत्नी, नात पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांची एचआरसीटी चाचणी करण्यात आली. त्यात सुरुवातीला त्यांचा स्कोअर ७ इतका आला. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला.
मधुमेह आणि वय जास्त असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करणे गरजेचे असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते सिंहगड रस्त्यावरील मोरया हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. उपचार सुरू असताना दोन दिवसांनी पुन्हा त्यांची एचआरसीटी चाचणी करण्यात आली. त्यात त्यांचा स्कोअर २५ पैकी २५ आला. स्कोअर अधिक असल्याने डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचारास सुरुवात केली. तसेच त्यांच्यासाठी पुढील दोन दिवस हे अत्यंत जोखमीचे असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांना सांगितले.
जिद्द, इच्छाशक्ती व योग्य उपचार पद्धतीमुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली. आता त्यांची प्रकृती उत्तम असून शनिवारी त्यांना हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले आहे.
कोट : एचआरसीटी स्कोअर २५ पैकी २५ आला तरी रुग्णांनी व नातेवाइकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. रुग्णांनी व नातेवाइकांनी सकारात्मक विचार ठेवून योग्य उपचार पद्धतीचा अवलंब केल्यास कोरोनावर विजय मिळविता येणे सहज शक्य आहे.
- डॉ. अजितसिंह पाटील, मेडिकल डायरेक्टर, मोरया हॉस्पिटल, सिंहगड रस्ता
जिद्द अन् इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. कोरोना झाल्यानंतर प्रत्येकाने सकारात्मक विचार केला पाहिजे. योग्य उपचारपद्धती व मनात सकारात्मक विचार असेल तर आपण कोरोनावर सहज मात करू शकतो.
- अशोक माने, ज्येष्ठ नागरिक