मुंबई - राज्यात कोरोना प्रादुर्भावामुळे लागू असलेल्या निर्बंधांमध्ये आता शिथिलता देण्यात आली आहे. राज्यातील १४ जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये आता आस्थापनं रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. तर शनिवारी आस्थापनं दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. रविवारी मात्र निर्बंध कायम असणार आहेत. मुंबईत रात्री 10 वाजेपर्यंत निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मात्र, पुण्यासह 4 जिल्ह्यातील नागरिकांसाठी आरोग्य विभागाने महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम राहणार आहेत. यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, पालघर, अहमदनगर, बीड, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये याआधीचेच निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. यातील पुणे, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या 4 जिल्ह्यात महत्त्वाच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
राज्यात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या चार जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर जास्त असून या चारही जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून त्यानुसार यंत्रणेला कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, या चारही जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना नोडल अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलं.
कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी कोरोना प्रतिबंध नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. जागतिक स्तरावर ज्या देशांमध्ये लसीकरण जास्त झाले तेथे तिसरी लाट आली तरी तिचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यामध्ये अधिकाधिक लसीकरण करण्यावर भर देण्यात येत असून अखंडितपणे लस पुरवठ्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे, असेही टापे यांनी सांगितले.
दरम्यान, पुण्यातील पुरंदर तालुक्यात झिका व्हायरसचा रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथक पाहणीसाठी आले होते. या आजाराचे संक्रमण झाले नसून आरोग्य यंत्रणांमार्फत उपाययोजना केल्या जात आहेत, असेही राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
नेमकं काय सुरू राहणार?
>> अत्यावश्यक आणि इतर सर्व दुकानं, शॉपिंग मॉल्स सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. तर शनिवारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. रविवारी अत्यावश्यक दुकानं वगळता इतर सर्व आस्थापनं बंद राहणार आहेत.
>> व्यायाम, जॉगिंग आणि सायकलिंगसाठी सार्वजनिक बाग आणि खेळाची मैदानं सुरू होणार आहेत.
>> शासकीय आणि खासगी कार्यालयं पूर्ण क्षमतेनं पण कोरोना संबंधिचे सर्व नियम पाळून कर्मचाऱ्यांची गर्दी होणार नाही याची काळजी घेऊन शिफ्टचं व्यवस्थापन करावं लागणार आहे.
>> जीम, योगा सेंटर, हेअर कटिंग सलून, ब्युटी पार्लर, स्पा एसी सुरू न ठेवता एकूण ५० टक्क्यांच्या क्षमतेनं सुरू ठेवता येणार आहे.
>> रेस्टॉरंट्स एकूण क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेनं दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार
>> चित्रपटगृह, नाट्यगृह पुढील आदेशापर्यंत बंदच राहतील
>> सर्व धार्मिक स्थळं बंदच राहणार आहेत.