जेजुरी : पुणे -पंढरपूर महामार्गावरील जेजुरी-सासवडदरम्यान मोटारीचा थरारक पाठलाग करून जेजुरी पोलिसांनी सुमारे दोन लाखांच्या गुटख्यासह दोन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून बेकायदा गावठी पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहे.
सुभाष मोहनलाल बिश्णोई (वय २३), रुपाराम काळूराम बिश्णोई (वय २५, रा. केसनंद फाटा वाघोली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. जेजुरी - बेलसर रस्त्यावर पांढऱ्या रंगाच्या मोटारीमधील (एमएच १२, जेएम. ९९२९) दोन इसम पिस्तूलासह जेजुरी परिसरात फिरत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने, पोलीस उपनिरीक्षक राजेश माळेगावे पाटील यांना खबºयाकडून माहिती मिळाली होती. पोलीस अधिकारी व कर्मचारी सचिन पड्याळ, रणजित निगडे, किसन कानतोडे, अक्षय यादव, संतोष अर्जुन, प्रल्हाद आव्हाड आदींनी वाहनाचा शोध घेतला असता पोलिसांना हूल देत वाहनासह आरोपी सासवडकडे पळाले. पोलीस कर्मचारी भरत आरडे, अविनाश निगडे, कैलास सरक आदींनी शोध घेण्यास सुरुवात केली. दोन्ही बाजूकडून नाकाबंदी झाल्याने वाहनासह दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले. यावेळी वाहनाची तपासणी केली असता गुटखा व बेकायदा अग्निशस्त्र मिळून आले.