पुणे : राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत राज्य शासनाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षासुद्धा रद्द केली जाऊ शकते, असा अंदाज शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात असला तरी अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.
राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलली आहे. दरवर्षी फेब्रुवारीमध्ये होणारी शिष्यवृत्ती परीक्षा यंदा कोरोनामुळे परीक्षा २३ मे रोजी होणार आहे, असे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे. परंतु, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ही परीक्षा जून महिन्यात घेता येऊ शकते का? याबाबत चाचपणी केली जात आहे.
दरवर्षी पाचवी आणि आठवीचे सुमारे १० लाखांहुन अधिक विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी करतात. परंतु, यंदा ही संख्या चांगलीच घटली आहे. पाचवी आणि आठवीसाठी घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण ६ लाख २८ हजार ६३० विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी केली गेली आहे. इयत्ता पाचवीसाठी ३ लाख ८६ हजार ३२८ विद्यार्थ्यांची नोंदणी केली असून आठवीसाठी २ लाख ४२ हजार ३०२ विद्यार्थ्यांची नोंदणी केली आहे. दरवर्षी शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येचा विचार करता ही संख्या निम्म्याने घटल्याचे दिसून येत आहे.
कोट
पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन येत्या मे किंवा जून महिन्यात परीक्षा घेण्याचा विचार आहे. राज्य शासन इयत्ता बारावीच्या परीक्षा संदर्भात काय निर्णय घेते; याचा अभ्यास करून शासनाच्या निर्देशाप्रमाणे शिष्यवृत्ती परीक्षांबाबत निर्णय घेतला जाईल.
- तुकाराम सुपे, आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद