पुणे: पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासह पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाची (Pune Nashik Expressway) आखणी करण्याबाबत राज्य सरकार विचार करीत आहे. याबाबत पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्य रस्ते विकास महामंडळाला चाचपणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पांसाठी खेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमीन संपादित होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी सध्या पुणे - नाशिक दृतगती महामार्गाचे सुरू असलेले काम तूर्त थांबवा, अशाही स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या आहेत.
पुणे-नाशिक हा सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा असल्याने हा प्रकल्प रखडला आहे. त्यातच राज्य सरकारने नुकतेच पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगतीमहामार्ग करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यासंदर्भात राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मार्गाची आखणीही करण्यात आली. मात्र, या औद्योगिक महामार्गाला स्थानिक लोकप्रतिनिधींसह शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे.
या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बुधवारी (दि. १२) बैठक झाली. त्यात सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील, जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अतुल बेनके, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, आदी उपस्थित होते.
पुणे नाशिक रेल्वे, तसेच औद्योगिक द्रुतगती महामार्गामुळे खेड तालुक्यातील मोठ्या प्रमाणात जमिनी बाधित होत आहेत. यापूर्वीच्या विविध प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांच्या जमिनींची खरेदीही झाली आहे. पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाच्या आखणीमुळे अनेक जमिनी जाणार आहेत. तसेच स्थानिक भागाला, तसेच चाकण येथील औद्योगिक कंपन्यांना त्याचा फायदा होणार नाही. औद्योगिक महामार्गाची आखणी चाकणपासून काही अंतरावर आहे. तसेच तळेगाव-शिक्रापूर मार्गावरील राशे गावात रेल्वे आणि औद्योगिक महामार्ग क्रॉस होत असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, याकडे मोहिते-पाटील यांनी लक्ष वेधले.
‘झिगझॅग’ पद्धतीने महामार्गाची आखणी केली असून, त्याचा औद्योगिक कंपन्यांना उपयोग नाही. त्यामुळे या मार्गाला आम्ही सर्व लोकप्रतिनिधींना विरोध केला आहे. महामार्गाची आणखी करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नाही, असेही पवार यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गासाठी आखणी करण्यात आली. त्याला जोडूनच औद्योगिक महामार्गाची आखणी करता येईल का, त्याबाबत चाचपणी करा. तसेच औद्योगिक महामार्गासंदर्भात सध्या सुरू असलेले काम थांबवा, अशा सूचना पवार यांनी यावेळी दिल्या. त्यानुसार, पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग रेल्वे मार्गाला जोडून घेता येईल का, याबाबत चाचपणी करू, असे महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.