पुणे : शहरात नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी राजकीय पक्ष, सामाजिक संघटना मोर्चे, धरणे, निदर्शने, बंद व उपोषणासारखे आंदोलन सुरू असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मनाई आदेश लागू करण्याचे आदेश विशेष शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिले आहेत.
पुणे शहर परिसरात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी महाराष्ट्र पोलिस अधिनियम सन-१९५१ च्या कलम ३७ (१) (२) (३) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. हा आदेश २८ मे २०२४ ते १० जून २०२४ पर्यंत लागू आहे. याअंतर्गत कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, ज्वलनशील द्रव पदार्थ बरोवर नेणे, दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे, शस्त्रे, सोटे, भाले. तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेण्यास मनाई आहे.
तसेच कोणत्याही व्यक्तीच्या चित्राचे प्रतीकात्मक फोटो, पुढाऱ्यांच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे, मोठ्याने अर्वाच्च घोषणा देणे सार्वजनिक टीका करणे, भाषणे देणे, मिरवणूक काढणे, उच्चार गाणी गाणे वाद्य वाजवण्यास मनाई केलेली आहे. हा आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना तसेच खासगी सुरक्षा रक्षक किंवा गुरखा किंवा चौकीदार यांना लागू होणार नाही.