पुणे : शहराच्या पाणी पुरवठ्याबाबत गुरुवारी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक होणार आहे. मुंढवा येथील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे काम न्यायालयीन स्थगितीमुळे रखडल्याने पाणीकपातीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर धरणातील पाणीसाठा विचारात घेऊन जुलैअखेरपर्यंत शहराला करावयाच्या पाणीपुरवठ्याबाबत निर्णय घेण्यासाठी विधानभवन येथे बैठक होणार आहे. मुंढवा येथील सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर सव्वा टीएमसी पाणी पाटबंधारे विभागाकडून पुणे शहराला जास्तीचे मिळणार होते. त्यामुळे मागील बैठकीत पुणेकरांच्या पाण्यात कोणतीही कपात न करण्याचा निर्णय घेतला होता. मुंढवा जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. मात्र, एका शेतकऱ्याने त्याची जागा देण्यास नकार दिल्याने प्रकल्प रखडला आहे. सांडपाणी प्रकल्प सुरू न झाल्याने पुण्याला जास्तीचे पाणी मिळणार का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पावसाळा लांबल्यास पुणेकरांना पाणी टंचाईला तोंड द्यावे लागेल याचा विचार करून पाणीकपातीबाबत आत्ताच निर्णय घ्यावा लागणार आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वरसगाव, टेमघर, खडकवासला आणि पानशेत धरणांमध्ये सध्या पावणेआठ टीएमसी पाणी आहे. (प्रतिनिधी)
पुण्यात पाणीकपात होण्याची शक्यता
By admin | Published: May 07, 2015 5:09 AM