पुणे : आजवर दुचाकी, सोनसाखळी किंवा पर्ससारख्या वस्तूंची चोरी झाल्याचे ऐकायला मिळाले आहे. पण चतु:श्रृंगी येथील सहारा हॉटेलसमोरील भारतीय डाक लिहिलेली पत्रपेटीच चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूद्ध चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नाथु बधे (वय ५३, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मॉडर्न कॉलनी पोस्ट ऑफिस शिवाजीनगर येथे एम.टी.एस (शिपाई)म्हणून काम पाहातात. ते नेहमीप्रमाणे १ मे रोजी पोस्ट आॅफिस कार्यक्षेत्रातील पत्रपेटीमधील पत्रे काढण्यासाठी सेनापती बापट रस्त्यावरील चतु:श्रृंगी येथे गेले. त्यांनी पत्रपेटीतील पत्रे काढून पेटी कुलूप लावून बंद केली. मात्र दोन दिवसांनी पुन्हा पत्रपेटीमधील पत्रे काढण्यासाठी गेले असता त्यांना सहारा हॉटेलच्या बाजूच्या भिंतीच्या ग्रीलला तारेने अडकवलेली लाल रंगाची लोखंडी पत्रपेटी दिसली नाही. कुणीतरी पत्रपेटी चोरून नेली असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असता अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्ह्याची नोंद केली आहे. अविराज नरूटे पुढील तपास करीत आहेत.