डॉ. नारळीकर यांचा सशर्त होकार : २४ जानेवारीला संमेलनाध्यक्ष होणार निश्चित
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नाशिक येथे होत असलेल्या आगामी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होणार, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. घटक संस्था आणि संलग्न संस्थांनी २० जानेवारीपर्यंत साहित्य महामंडळाकडे संमेलनाध्यक्षपदासाठी संभाव्य नावे पाठवायची आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर, संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे आणि लातूरमधील ज्येष्ठ लेखक जनार्दन वाघमारे यांची नावे पाठवण्यात आल्याचे समजते.
संमेलनाच्या आयोजनासाठी नाशिकवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर संमेलनाध्यक्ष आणि कार्यक्रमपत्रिका ठरवण्यासाठी २४ जानेवारी रोजी साहित्य महामंडळाची बैठक पार पडत आहे. चारही घटक संस्थांतर्फे प्रत्येकी तीन प्रतिनिधी, पाच संलग्न संस्था आणि एका समाविष्ट संस्थेचे प्रत्येकी एक याप्रमाणे सहा प्रतिनिधी, विद्यमान संमेलनाध्यक्ष अशा १९ जणांच्या मतांचा कौल घेत बहुमताने एका नावावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. डॉ. अरुणा ढेरे, फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्यानंतर ज्येष्ठत्व आणि श्रेष्ठत्व असलेल्या कोणत्या नावावर शिक्कामोर्तब होणार, याबाबत उत्सुकता आहे. डॉ. जयंत नारळीकर यांच्या नावाला विरोध होणार नाही आणि एकमताने निवड केली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
संमेलनाध्यक्षपदासाठी संभाव्य नावांची विविध समाजमाध्यमांवर चर्चा सुरु आहे. साहित्य परिषदेकडे काही नावांची शिफारस करण्यात आली आहे. काही लेखक स्वत: फोन करुन स्वत:चे नाव सुचवण्याचा प्रयत्न करत आहेत. सविस्तर चर्चा करुन याबाबतचा निर्णय घेतला असल्याचे परिषदेच्या पदाधिका-यांकडून सांगण्यात आले. यशवंत मनोहर यांचे नावही चर्चेत आहे. मात्र, सरस्वतीचा फोटो लावला म्हणून त्यांनी पुरस्कार नाकारल्याची घटना नुकतीच चर्चेचा विषय ठरली. लातूरचे जनार्दन वाघमारे यांचे नावही संभाव्य संमेलनाध्यक्षांच्या यादीत असल्याचे बोलले जात आहे. पुण्यातील काही संस्थांकडून लेखक डॉ. अनिल अवचट यांच्या नावासाठी जोर लावण्यात आला होता.
-------------------------
नाशिक येथे होत असलेल्या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी २४ जानेवारी रोजी साहित्य महामंडळाची बैठक पार पडणार आहे. त्यानुसार १९ तारखेपर्यंत महामंडळाकडे नावे पाठवण्याची मुदत होईल. संमेलनाध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता सन्मानाने निवड करण्याचा पायंडा गेली दोन वर्षे यशस्वीरित्या राबवण्यात आला. याही वर्षी संभाव्य नावांबाबत सविस्तर चर्चा करुन बहुमताने निवड केली जाईल.
- प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद
----------------------------
वैज्ञानिक लेखनाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी नारळीकर सरांचे नाव सुचवले गेले आहे. त्याचा नक्कीच मान ठेवला जाईल. नारळीकर सरांनी सशर्त होकार दिलेला आहे. सरांचे वय आणि तब्येत लक्षात घेता संपूर्ण तीन दिवस त्यांना संमेलनस्थळी उपस्थित राहणे शक्य होणार नाही. उदघाटनाला प्रत्यक्ष उपस्थित राहून समारोपाच्या वेळी ते आॅनलाईन हजेरी लावू शकतात.
- डॉ. मंगला नारळीकर